
सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवानिमित्त कुडाळात ग्रंथदिंडी लक्षवेधी
सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवानिमित्त
कुडाळात ग्रंथदिंडी लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ : परंपरिक वेशभूषेत लेझीमच्या तालावर ‘पुस्तक देती हमको ज्ञान’, ‘चांगले पुस्तक-चांगले शिक्षक’ अशा घोषणा देत कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई तथा टोपीवाला वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय येथून ग्रंथदिंडीने येथे आयोजित ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२’ ची दिमाखात सुरुवात झाली. नगराध्यक्ष आफरीन करोल यांच्या हस्ते या ग्रंथ पूजनाने दिंडीचा प्रारंभ झाला.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथ संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आयोजित सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ ला कुडाळ येथे सुरुवात झाली. २७ आणि २८ मार्च या दोन दिवशी हा ग्रंथोत्सव कुडाळमध्ये आयोजित केला आहे. ग्रंथदिंडीतील पालखीत भारताचे संविधान, भगवतगीता, विश्वकोष यांचा समावेश होता. राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे उपस्थित होते. आजच्या ग्रंथ दिंडीमध्ये कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज, बॅ. नाथ पै विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले. वाचनालय ते महालक्ष्मी हॉलपर्यंत कुडाळ बाजारपेठ मार्गे ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीमध्ये अनेक मान्यवरांचा सहभाग होता.