
वरवडे मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
वरवडे मारहाण प्रकरणी
दोघांवर गुन्हा दाखल
कणकवली,ता.२७ ः वरवडे परबवाडी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. मारहाणीही ही घटना काल (ता.२६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी किशोरी किशोर परब (वय ४४, रा. वरवडे) यांनी आज येथील पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी बाबु कशीराम निर्गुन व गणेश बाबु निर्गुन (दोघेही रा. वरवडे, घाडीवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मारहाणीत जखमी झालेले किशोर परब यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
किशोरी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी घरी असताना गावातील बाबु निर्गुण यांची गुरे नेहमीप्रमाणे आमच्या कुंपणात आली. तेव्हा बाबु व त्यांचा मुलगा गणेश हे गुरांना परत घेऊन जाण्यासाठी आमच्या घराकडे परबवाडी येथे आले होते. त्यावेळी मी त्यांना तुमची गुरे वारंवार त्रास देतात. फुलझाडांची नुकसान करतात. तुमची गुरे बांधुन का ठेवत नाही? असा प्रश्न केला. त्यांना याचा राग आला. गणेश निर्गुन याने फिर्यादी किशोरी यांना घरासमोरील रस्त्यावर धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. आपले पती भांडण सोडवण्यासाठी आले असता बाबु याने लाकडाने किशोर मनोहर परब यांच्या डोक्यात मारहाण केली. पती रस्त्यावर पडले असता बाबु व त्याचा मुलगा गणेश घटनास्थळाहून पळून गेले. जखमी पतीला सरकारी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.