आठवडा बाजार हलविण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवडा बाजार हलविण्याचे आदेश
आठवडा बाजार हलविण्याचे आदेश

आठवडा बाजार हलविण्याचे आदेश

sakal_logo
By

91833
सावंतवाडी ः येथील पालिकेत सोमवारी आयोजित बैठकीत दीपक केसरकर, के. मंजुलक्ष्मी व अन्य अधिकारी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

आठवडा बाजार हलविण्याचे आदेश
दीपक केसरकर ः चार ठिकाणी विभागून बसणार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः शहरातील आठवडा बाजार हलविण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज पालिका प्रशासनाला दिल्या. शहरातील चार ठिकाणी विभागून आठवडा बाजार भरवला जाणार आहे. त्यात शहरातील पांजरवाडा, रघुनाथ मार्केट, चितारआळी, तसेच शांतिनिकेतन मागील स्लॅब या जागा बाजारासाठी निश्चित केल्या आहेत. व्यापाऱ्यांची संख्या निश्चित करून याची अंमलबजावणी तत्काळ करा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनास केल्या.
केसरकर यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पालिका सभागृहात घेतली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पाटबंधारे अधिकारी विजय थोरात, रोहित कोरे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘‘शहरातील कुठलाच प्रश्न प्रलंबित राहणार नाही, असे काम करा. शहरात होणाऱ्या भाजी मंडईतील गाळेधारकांना पर्यायी जागा दिली असून, शंभर गाळे शहरात मोक्याच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारले जाणार आहेत. त्याचीही जागा निश्चित झाली असून, ती जागा व्यापाऱ्यांना दाखवावी. आठवडा बाजार मोती तलावाच्या काठावर होता; पण आता तो शहरालगतच म्हणजे पांजरवाडा, रघुनाथ मार्केट, चितारआळी व शांतिनिकेतन मागील स्लॅबच्या ठिकाणी भरेल. वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ न देता तसेच शहराचे विद्रुपीकरण न करता पालिकेच्या खर्चाने संबंधित व्यावसायिकांना व्यवस्था करून दिली जाणार आहे.’’
येथील सफाई कामगारांची पीएफची रक्कम मागील तीन वर्षांपासून संबंधित ठेकेदाराकडून खात्यात जमा नाही, याकडे माजी नगरसेवक गोविंद वाडकर यांनी केसरकरांचे लक्ष वेधले. त्यानंतर मुख्याधिकारी जावडेकर यांनी याबाबत खुलाशाचा प्रयत्न केला; मात्र केसरकर यांनी यावर कोणतीही विनंती ऐकून घेतली जाणार नसून येत्या चार दिवसांत बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. माजी नगरसेवकांनी शहरातील पाण्याबाबत केलेल्या तक्रारी तत्काळ सोडविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. माजगाव-मेटवाडा येथील पाणी प्रश्नाबाबत आढावा घेत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. सद्यस्थितीत स्वखर्चातून पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही केसरकर यांनी दिली.