सदर ः शाश्वत उद्योगासाठी नेटवर्किंग आवश्यकच

सदर ः शाश्वत उद्योगासाठी नेटवर्किंग आवश्यकच

rat२८१२.txt

(१५ मार्च टुडे तीन)


धरू कास उद्योजकतेची ............लोगो

फोटो ओळी
-rat२८p५.jpg ः

91862
प्रसाद जोग
------------

शाश्वत उद्योगासाठी नेटवर्किंग आवश्यकच

कोणताही छोटा-मोठा उद्योग सुरू करताना किंवा वाढवताना उद्योजकाला विविध आव्हानांना सामोरे जावे लागते, तसेच उद्योग करताना येणाऱ्या विविध अडचणी आत्मविश्वासाने सोडवाव्या लागतात. उद्योजकीय व्यस्त दिनचर्येमुळे उद्योजकाला आपण उद्योग चालवतोय की, उद्योग आपल्याला चालवतोय, हेच समजून येत नाही. कामाच्या व्यापामुळे, अपुऱ्या साधनसामग्रीमुळे किंवा योग्य उद्योजकीय परिसंस्था नसल्यामुळे उद्योजक हा आपल्या कामाकडेच फक्त लक्ष देण्याच्या मानसिकतेत राहतो; पण दैनंदिन क्रियाकलापात अडकलेला उद्योजक उद्योगवाढीसाठी आवश्यक असणारा लोकसंग्रह किंवा उद्योगास अनुकूल व भविष्यात गरजेच्या ठरू शकणाऱ्या पूरक उद्योग-व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांशी स्नेहसंबंध प्रस्थापित करण्यात कमी पडतो. त्यामुळे उद्योजकाला स्वतःचा व्यवसाय वाढवण्यास अनुकूल किंवा पोषक परिस्थिती निर्माण करण्यास अपयश येऊ शकते व एकटेपणाची किंवा तुटक भावना येऊ शकते.
- प्रसाद जोग, रत्नागिरी
......................

संवादाच्या अभावामुळे एकाकी किंवा आत्मकेंद्री उद्योजकीय मानसिकता तयार होऊ शकते व पुढे जाऊन ती धोक्याची घंटा असू शकते. कारण, सामाजिक प्रतिष्ठा किंवा उद्योजक म्हणून वेगळी व्यावसायिक ओळख निर्माण करणे हीसुद्धा एखाद्या उद्योजकाची सुप्त गरज असू शकते व या गरजेची पूर्तता न झाल्यास उद्योजक विचलित होऊन काही प्रमाणात तणावग्रस्त होऊ शकतात. व्यवसायासाठी घेतलेली कर्जे, प्रतिस्पर्ध्यांचे दडपण व व्यावसायिक सकारात्मक मानसिकतेचा अभाव यामुळे उद्योजकावर न झेपणारे मानसिक दडपण येऊ शकते. यावर उत्तम उपाय म्हणजे आपल्यासारख्याच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या माणसांच्या सहवासात राहून त्यांच्याशी विचारमंथन करून आपल्या उद्योगाची भविष्यातील दिशा ठरवणे होय.
प्रत्येक उद्योजकाला श्रीमंत व्हायचे असते; पण श्रीमंत होण्यासाठी आवश्यक असणारी व्यावसायिक गुणवत्ता आणि श्रीमंतीची मानसिकता असलेल्या उद्योजकांच्या संगतीचा अभाव यामुळे सतत कार्यमग्न असूनही उद्योजकांना खऱ्या अर्थाने श्रीमंतीचे सूत्र सापडतेच असे नाही.
पहिल्या पिढीतील उद्योजकाला स्वतःचा उद्योग समजावून घेत आपल्या उद्योग विस्तारासाठी आवश्यक असलेल्या इतर उद्योजकीय आस्थापनांची कार्यप्रणाली समजावून घेण्याची खरी गरज असते. बिझनेस नेटवर्किंग ही एक कला असून, ती अवगत केल्यास उद्योजकाला शाश्वत उद्योगवाढीसाठी व नवीन ओळखी वाढवून व्यवसाय अधिक गतिमान करण्यासंदर्भात त्याचा विशेषत्वाने उपयोग होत असतो व उद्योजकासाठी श्रीमंतीचा मार्ग सुलभ व सुकर होत असतो. उद्योग करणाऱ्या माणसाची शैली, विचार करण्याची पद्धत, त्यांच्या कामाचे स्वरूप सकारात्मक व उद्योजकीय मानसिकतेने प्रेरित असल्याने अशा सृजनशील, सकारात्मक विचारसरणीच्या कर्तृत्ववान स्वयंप्रेरित उद्योजकांशी मैत्री वाढवून त्यांना भेटणे, बोलणे यामुळे बिझनेस नेटवर्क वाढीस लागून नव्याने बळकट होत असलेल्या प्रगल्भ उद्योजकीय परिसंस्थेचा लाभ घेता येतो व नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात. एकमेकांना सहाय्य करण्याची वृत्ती असलेल्या व्यावसायिक मित्रांच्या संघटनेमुळे एकमेकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अपेक्षित सहकार्य केले जाते.
माधवराव भिडे यांच्या संकल्पनेतून सन २००० मध्ये मराठी उद्योजकांच्या हितासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (SCGT) ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली. मराठी उद्योजकांसाठी वैश्विक व्यासपीठ तयार करून या विचारमंचावरून उद्योजकतेचे संस्कार करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन विभागवार यांच्या शाखा सुरू करण्यात आल्या. ''एकमेका साहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत'' हे घोषवाक्य घेऊन पहिल्या पिढीतील तरुण उद्योजकांच्या एकत्रीकरणाचे व व्यवसायवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम ही संस्था गेली २२ ते २३ वर्षे करत आलेली आहे. कोकणात व्यावसायिक आणि उद्यमींचे संघटन बळकट व्हावे यासाठी रत्नागिरी विभागात रत्नागिरी व चिपळूण तालुक्यांत सॅटर्डे क्लबचे चॅप्टर सुरू झाले असून, यामधून नोंदणीकृत स्थानिक उद्योजकांना व्यवसायाच्या नवीन संधी एकमेकांच्या ओळखीतून मिळत आहेत. उद्योजकांना व्यवसायवाढीचा वेग वाढवायचा असल्यास बिझनेस नेटवर्किंग करावेच लागते. यातूनच नवीन लिड्स व रेफ्रन्सेस मिळण्याची शक्यता वाढत असते.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट अशा प्रकारचा पहिला बिझनेस नेटवर्क फोरम आहे; जो एनजीओ फॉर्मॅटमध्ये काम करतो. ना नफा धोरणावर चालणारी ही संस्था असून, तिची स्थापना महाराष्ट्रीयन तरुणांच्या प्रचंड प्रतिभेला आणि कार्यकुशलतेला शाश्वत उद्यमशीलतेमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने केली आहे. सॅटर्डे क्लबचे मुख्य उद्दिष्ट उद्योजकतेद्वारे वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय संपत्ती आणि रोजगार निर्माण करणे आहे. यामुळे मराठी उद्योजकांना प्रेरक व पोषक वातावरण उपलब्ध होते. व्यवसायवाढीसाठी आवश्यक असणाऱ्या संभावित ग्राहकांचे संदर्भ अशा फोरममधून एकमेकांशी सामायिक केले जातात व त्यातून व्यावसायिकांमध्ये स्नेहभाव वाढवून एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांच्या साथीने सर्वांगीण, सर्वंकष, सर्वसमावेशक, सकारात्मक उद्योग विस्ताराकडे कल दिसून येतो. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नोंदणीकृत व्यावसायिकांसाठी बिझनेस नेटवर्किंगची भरपूर संधी महाराष्ट्रातील क्रॉस चॅप्टर मीटिंगद्वारा उपलब्ध करून देते. क्रॉस चॅप्टरमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याने उद्योजकांचा जनसंपर्क वाढून त्यांचा बिझनेस रिच वाढतो. दोन सहयोगी उद्योगींमध्ये संयुक्त उपक्रम, प्रकल्प राबवले जाऊ शकतात. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टद्वारे मिळालेल्या संदर्भांवर, रेफरन्सेसवर, ओळखींवर होणाऱ्या व्यवसायावर कोणतेही कमिशन/कोणतीही किंमत आकारली जात नाही, हे विशेष.
बिझनेस सेल आणि विविध पॉवर ग्रुप्सद्वारे उद्योजकांच्या व्यवसायासाठी अतिरिक्त समर्थनीय उपक्रम राबवले जातात आणि उद्योजकांसाठी हँडहोल्डिंग सपोर्ट दिला जातो. जगभरात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे जाळे असल्यामुळे उद्योजकाला लोकल टू ग्लोबल भरारी घेता येते. भारताबाहेर असलेल्या महाराष्ट्र मंडळातही नेटवर्क वाढीस लागल्यामुळे हे शक्य होते.

ठळक व महत्त्वाचे
* सिंधुदुर्गात कुडाळ येथे नव्याने चॅप्टर सुरू
* एमएसएमई, एमआयडीसी यांच्याबरोबर एकत्रित उपक्रम
* सभासद होऊन स्वतःचा उद्योग, व्यवसाय मराठी माणूस सहजतेने वाढवू शकतो
* आपल्या उद्योगाचे प्रेझेंटेशन देण्याची संधी दिली जाते
* प्रत्येक चॅप्टरमध्ये साधारण १५ दिवसांनी मीटिंग आयोजित केल्या जातात.
* उद्योजकीय ज्ञान वृद्धिंगत करणारे कार्यक्रम या क्लबद्वारे घेतले जातात.
* ८० पेक्षा जास्त चॅप्टर महाराष्ट्रात कार्यान्वित आहेत.
* ५ लाखांहून जास्त रेफरन्सेस या फोरमद्वारे सामायिक केले गेले आहेत
* ३५०० पेक्षा जास्त नोंदणीकृत सभासद आहेत.
* २००० पेक्षा जास्त नेटवर्किंग मीटिंग
* कोट्यवधी रुपयांची वर्षिक उलाढाल या माध्यमातून होत असते.

कोकण विभागात श्रीराम कोळवणकर हे कोकण प्रांतप्रमुख आहेत. चिपळूणचे नीलेश पवार हे चिपळूण चॅप्टरचे चेअरपर्सन असून, त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेल्या मुलाखतीत त्यांनी मराठी तरुणांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे कार्य समजून घेऊन आपल्या यशस्वी उद्योजकीय प्रवासासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सभासदत्व घ्यावे व स्वतःचे बिझनेस नेटवर्किंग वाढवून आपला स्वतःचा व आपल्या माध्यमातून सर्व मराठी उद्योग बंधू-भगिनींचा उद्योग, व्यवसाय वाढवावा, असे तरुणांना आवाहन केले आहे.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
............................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com