जि. प. अंदाजपत्रकात दडलंय काय?

जि. प. अंदाजपत्रकात दडलंय काय?

91897
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

91912
प्रजित नायर


जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात दडलंय काय?

सर्वसमावेशकतेचा प्रयत्न; एज्युकेशन एक्स्पोसह विविध उपक्रमांसाठी तरतूद

विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः जिल्हा परिषदेच्या २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात एज्युकेशन एक्स्पो, विद्यार्थ्यांची वैज्ञानिक संस्था भेट, पशू पक्षी प्रदर्शन या ठळक उपक्रमासाठी यावर्षी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. तसेच भरड धान्य अंतर्गत नाचणी पिकाला प्राधान्य देण्यासाठी अनुदान निश्चित करण्यात आले असून जिल्ह्यातील मधुमेहींची लक्षवेधी संख्या लक्षात घेत मधू संजीवनी योजना विकसित केली आहे. तसेच जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प व्यक्तिगत, सामूहिक विकासाबरोबर आरोग्य, कृषी या क्षेत्रावर भर देणारा आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासही प्राधान्य आहे.
जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी काल (ता.२७) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १३७, १३८, १३९ नुसार जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्नाचे २०२२-२३ चे २४ कोटींचे अंतिम सुधारित आणि २०२३-२४ चे १७ कोटींचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जाहीर केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे आदी उपस्थित होते. २०२२-२३ या वर्षात स्वनिधिमधून जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला ८१ लाख १६ हजार ३०० रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. यातून कार्यालयीन कामकाज गतिमान करण्यासाठी सर्व कार्यालयांना संगणक पुरविण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे २०२३-२४ साठी ३० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. लघु पाटबंधारे विभागामार्फत शेत पाट बांधणे, शेततळी बांधणे, जिल्हा परिषद मालकीच्या लहान पाट बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी २०२३-२४ करिता या विभागाला ३३ लाख २ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.
---------
५० पटावरील शाळांची दुरुस्ती
शिक्षण विभागासाठी २०२३-२४ च्या मूळ अंदाजपत्रकात एक कोटी ७० लाख ९६ हजार ६०० रुपये एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांना आयएसआरओ आणि आयआयएससी अशा वैज्ञानिक संस्थांना भेटी देणे, एज्युकेशन एक्स्पोसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. २०२२-२३ च्या अंतिम अंदाजपत्रकात शाळा छप्पर दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात ५० व त्यावरील पटसंख्या असलेल्या व गरज असलेल्या शाळांची छप्पर दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी २०२३-२४ च्या मूळ अर्थसंकल्पात ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
-----------
कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती
२०२३-२४ च्या मूळ अंदाजपत्रकात बांधकाम विभागाला ५ कोटी ५६ लाख ८२ हजार १०० रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. यातून ग्रामीण व इतर जिल्हा रस्ते बांधकाम यासाठी निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात जिल्हा परिषद प्राथमिक इमारत दुरुस्ती व देखभाल तसेच जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने यांची दुरुस्ती व देखभाल यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भेडसावणारी गळतीची समस्या सुटली जाणार आहे. २०२२-२३ च्या अंतिम अंदाजपत्रकात जिल्हा परिषद कार्यालय गळती थांबविण्यासाठी जिल्हा परिषद इमारत दुरुस्ती व देखभाल योजनेअंतर्गत तब्बल दोन कोटी ६४ लाख ११ हजार ३१६ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागासाठी २०२३-२४ करिता एक कोटी ३० लाख ५७ हजार १०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागासाठी २०२३-२४ करिता एक कोटी ९ लाख ५० हजार ३०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर २०२२-२३ च्या अंतिम अंदाजपत्रकात कुत्रिम रेतन सेवादाता योजनेसाठी पाच लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
-----------
हळद, नाचणीला प्राधान्य
कृषी विभागाला २०२३-२४ च्या मूळ अंदाजपत्रकात ९७ लाख १६ हजार ८०० रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. २०२२-२३ च्या अंतिम अंदाजपत्रकात पंतप्रधान यांनी सूचित केल्याप्रमाणे जागतिक भरड धान्य वर्षानिमित्त शेती अभिवृद्धी व सुधारणा करणेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे योजनेअंतर्गत नाचणी पिकाच्या लागवडीसाठी सहा लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. २०२३-२४ साठी दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय सुधारलेली बियाणे रोपे कलमे वाहतूक आणि खरेदी योजने अंतर्गत २०२२-२३ साठी शेतकऱ्यांना नव्यानेच हळद लागवड करण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर प्रोत्साहन देणारी योजना विकसित करण्यात आली आहे. यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०२३-२४ साठी सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
------------
मधुमेहींची काळजी
जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के नागरिकांना मधुमेह असल्याचा अंदाज आहे. यातील केवळ १२.१५ टक्के नागरिक मधुमेह तपासणी, उपचार घेत आहेत. ही भयावह स्थिती असल्याने मधुमेह रुग्णांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ''मधू संजीवनी योजना'' विकसित केली आहे. २०२२-२३ च्या अंतिम अंदाजपत्रकात यासाठी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०२३-२४ च्या मूळ अंदाजपत्रकात आरोग्य विभागाला एक कोटी एक लाख ४३ हजार ८०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
-------------
भजनी मंडळ खुश
भजन आणि भजनी मंडळे हे सिंधुदुर्गचे वेगळे समीकरण आहे. या भजनी मंडळांना जिल्हा परिषदेने साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायत विभागाकडे विशेष योजना सुरू केली आहे. ग्रामपंचायत विभागासाठी २०२३-२४ च्या मूळ अंदाजपत्रकात एक कोटी ९६ लाख ४६ हजार ३०० रुपयांची तरतूद केली आहे. यातून भजनी मंडळाना साहित्य पुरविण्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
--------------
अतिरिक्त आहार योजना
महिला व बाल कल्याण विभागाला २०२३-२४ च्या मूळ अंदाजपत्रकात ६० लाख २० हजार ५०० रुपयांची तरतूद आहे. यात कुपोषित बालके व किशोरवयीन मुली, गर्भवतींना अतिरिक्त आहार योजनेसाठी दहा लाख तर २०२२-२३ च्या अंतिम अंदाजपत्रकात १२ लाखांची तरतूद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com