आरोग्य केंद्र नको, बालवाडी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य केंद्र नको, बालवाडी द्या
आरोग्य केंद्र नको, बालवाडी द्या

आरोग्य केंद्र नको, बालवाडी द्या

sakal_logo
By

आरोग्य केंद्र नको, बालवाडी द्या

लाखे समाजाची मागणी; सावंतवाडीत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी, ता. २८ ः शहरातील लाखे वस्तीमधील सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून त्या ठिकाणी बालवाडी सुरू करण्यास मान्यता मिळावी, अशी मागणी लाखे डोंबारी समाजाच्यावतीने येथील पालिका प्रशासनाकडे करण्यात आली.
समाजाच्यावतीने आपल्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. त्यात असे म्हटले आहे की, लाखे वस्तीमध्ये गेली अनेक वर्षे पालिकेच्या माध्यमातून बालवाडी सुरू होती. कोरोना काळामध्ये सुरक्षिततेच्या हेतूने ती बंद करण्यात आली; मात्र अद्यापपर्यंत बंद केलेली बालवाडी पुन्हा सुरू केली नाही. असे असताना बालवाडी ज्या ठिकाणी भरवली जात होती, त्या पालिकेच्या इमारतीमध्ये समाजाला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाला लाखे डोंबारी समाजाचा विरोध आहे. सावंतवाडीत लाखे समाज दुर्बल परिस्थितीत या ठिकाणी वास्तव्य करत आहे. मोलमजुरी करून समाजाचे सदस्य आपले कुटुंब चालवत आहेत. त्यामुळे मुलांना खासगी शाळेत पाठवून शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे या समाजासाठी घरकुल योजनेतून उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये बालवाडी मंजूर असून त्या इमारतीचा उपयोग मुलांच्या शैक्षणिक विकासासाठीच व्हावा. इतर कोणत्याही उद्देशासाठी होऊ नये. त्यामुळे लाखे वस्तीत सुरू असलेल्या आरोग्य केंद्रास समाजबांधवांचा विरोध आहे. दुसरीकडे आरोग्य केंद्राचा विचार करता शहरात पालिकेचा दवाखाना तसेच उपजिल्हा रुग्णालय जवळच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आरोग्याबाबत सोय होऊ शकते; मात्र बालवाडी बंद झाल्यास खासगी शाळांचा शैक्षणिक खर्च उचलणे शक्य नसल्याने या ठिकाणीच बालवाडी पुन्हा सुरू व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर छाया लाखे, सीमा लाखे, अलका लाखे, महेश लाखे, संदीप लाखे, राजू लाखे, राकेश लाखे, प्रतीक्षा लाखे, दीपक लाखे, रेश्मा खोरागडे, विकास खोरागडे, सुवर्णा पाटील, मनीषा पाटील, शुभांगी पाटील, अनिकेत लाखे, प्राजक्ता खोरागडे, मंगेश बेळगावकर आदींच्या सह्या आहेत. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित समाजाच्या युवकांना मार्गदर्शन करताना, प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पालिकेच्या सभेमध्ये ठराव घेऊन मंजूर करण्यात आले आहे, त्यामुळे ते बंद करता येणार नाही; परंतु बालवाडी पुन्हा सुरू करायची झाल्यास जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत प्रयत्न करावा, असे सूचित केले.