
-दापोलीत चालक, वाहकांची 84 पदे रिक्त
दापोलीत चालक, वाहकांची ८४ पदे रिक्त
दाभोळ, ता. २८ ः एसटी महामंडळाच्या दापोली आगारामध्ये वाहक, चालक अशी ८४ पदे रिक्त असल्याचे त्याचा परिणाम गाड्या वेळेवर न सुटण्यात होत असून ही पदे लवकरच भरण्यात यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
राज्यभरात एसटी ही सर्वसामान्य जनतेची वाहिनी म्हटली जाते. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात; मात्र दापोली आगारात वाहक व चालकांची संख्या कमी असल्याने त्याचा ताण अन्य वाहक व चालक यांच्यावर येत असल्याने अनेक बसेस वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
दापोली आगाराला ३७० वाहक व चालकांची गरज असून, चालक ६७, वाहक ४३ तर वाहक अधिक चालक १७६ कार्यरत आहेत. त्यामुळे महामंडळाच्या नियमानुसार, अधिकची ड्युटी चालक, वाहकांना करावी लागते. एसटी बसेसच्या दुरुस्तीसाठी आगाराच्या कार्यशाळेत ७० पदे असून, त्यात ३३ कर्मचारी कार्यरत आहेत. ३७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे बसेसची दुरुस्ती वेळेवर होत नाही. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अधिकचे काम येऊन पडते. त्यामुळे सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.