‘आनंदाचे शिदो मिळालो काय गो?’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आनंदाचे शिदो मिळालो काय गो?’
‘आनंदाचे शिदो मिळालो काय गो?’

‘आनंदाचे शिदो मिळालो काय गो?’

sakal_logo
By

91984
कणकवली ः येथील तहसीलदारांना शिवसेना महिला आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नीलम पालव, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, दिव्या साळगावकर यांच्यासह सतीश सावंत, गौरीशंकर खोत, सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

91983
कणकवली ः येथील पटवर्धन चौकात शिवसेना महिला आघाडीच्यावतीने चुलीवर जेवण, भाकऱ्या भाजून तसेच सिलेंडर आडवा करून महागाई विरोधात आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात आमदार वैभव नाईक यांनीही सक्रिय सहभाग घेतला.


‘आनंदाचे शिदो मिळालो काय गो?’

कणकवलीत सरकारविरोधी घोषणा; शिवसेना महिला आघाडीतर्फे महागाईचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ ः आनंदाचे शिदो मिळालो काय गो? साखर तांदळाचा पोता पळाला काय गो? अशा घोषणा देत शिवसेना महिला आघाडीच्यावतीने तालुक्यातील महिलांनी आज महागाई विरोधात सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले. कणकवलीच्या पटवर्धन चौकात तब्बल दोन तास चुलीवरची भाकरी भाजून आणि स्वयंपाक गॅस सिलेंडर उलटा ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
महिला आघाडी प्रमुख नीलम पालव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चामध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना प्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. पटवर्धन चौकात दोन तास आंदोलन छेडल्यानंतर तहसीलदार रमेश पवार यांना महागाई विरोधात निषेधाचे निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची सांगता झाली.
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे आज महिलांनी महागाई विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. येथील पटवर्धन चौकात सकाळी अकराला या मोर्चाला सुरुवात झाली. महिला आघाडीप्रमुख निलम पालव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे, माजी पंचायत समिती सदस्या अंजली सापळे, माधवी दळवी, संजना कोलते, दिव्या साळगांवकर, धनश्री मेस्त्री, नगरसेविका मानसी मुंज आदींसह तालुक्याच्या विविध भागातून जवळपास २०० पेक्षा अधिक महिला या महागाई निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. शिवसेनेमध्ये दुफळी झाल्यानंतर प्रथमच या मोर्चाचे आयोजन केले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरातील पटवर्धन चौकामध्ये महिलांनी चुलीवर जेवण करत या वाढत्या महागाईचा विरोध निषेध केला. सिलेंडर आडवा करून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या त्या काळातील आंदोलनाची जनतेला आठवण करून दिली. विविध घोषणाबाजी देत महिलांनी परिसर दुमदुमून सोडला.
जिल्हा महिला आघाडी प्रमुख पालव म्हणाल्या, ‘‘सध्या देशात आणि राज्यात द्वेषाचे राजकारण चालू आहे. जाती-जातीमध्ये वाद लावले जात आहेत. त्यामुळे महिलांना आझादी हवी आहे. सत्तेत आल्यानंतर भाजप समविचारी पक्षांनी केवळ घोषणाबाजी केली; पण, दुसरीकडे स्वयंपाक गॅसच्या दरात प्रचंड वाढवत आहेत. जीवनावश्यक वस्तू मागल्या आहेत. एसटी महामंडळामध्ये पन्नास टक्के महिलांना सवलत दिली आहे; पण, रोजच्या जेवणासाठी गरीब महिलांना अन्नाची गरज आहे. मोठा गाजावाजा करून आनंदाचा शिधा जाहीर करण्यात आला; परंतु, तो जनतेपर्यंत पोहोचलाच नाही. अशा विविध तक्रारी त्यांनी महिलांसमोर मांडल्या. महिलांकडूनही या निषेध आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.’’
यावेळी आमदार नाईक म्हणाले, ‘‘केंद्र आणि राज्य वाढत चाललेल्या प्रचंड महागाईला नियंत्रणात आणू शकलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे कठीण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सातत्याने होत आहे. स्वयंपाक गॅस बाराशे रुपयावर पोहचला आहे. तरीही सरकार कोणताही पर्याय करीत नाही. त्यामुळे संपूर्ण देशात आणि राज्यातही सत्ताधारी सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. हा मोर्चा ही एक झलक आहे; पण, यापुढे सरकार विरोधातील आंदोलन तीव्र केले जाईल.’’ यावेळी गौरीशंकर खोत, सुशांत नाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आंदोलन झाल्यानंतर मुख्यबाजरेठेतून घोषणाबाजी देत शहरातील तहसीदार कार्यालयात तहसीलदार पवार यांना शिवसेना महिला आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
----
चौकट
आचारी बदलण्याची गरज
श्री. सावंत म्हणाले, ‘‘दोन वर्षांपासून प्रचंड महागाई वाढत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतीमालाच्या किमतीतही वाढ होत आहे. शेतकरी उपाशीपोटी राहत आहेत. एक वेळचे जेवणही मिळणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला मिळत आहेत. आता ही वस्तुस्थिती बदलायची असेल तर खऱ्या अर्थाने महिला जागृत झाल्या पाहिजेत. महागाईला रोखण्यासाठी केवळ सिलेंडर बदलून चालणार नाही, तवाही बदलून चालणार नाही. भाकरी ही करपतच राहणारच. त्यामुळे आचारी बदलावा लागेल ही जबाबदारी आता महिलांची आहे. देशातला आणि राज्यातला खरा आचारी तो जनतेला पोटभर अन्न देऊ शकेल, असा राज्यातला सत्ताधारी बसला पाहिजे.’’