शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांवर मागवले मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांवर मागवले मार्गदर्शन
शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांवर मागवले मार्गदर्शन

शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांवर मागवले मार्गदर्शन

sakal_logo
By

आंतरजिल्हा शिक्षक बदल्यांवर मागवले मार्गदर्शन

सीईओंचा निर्णय ; शासनाच्या निर्णयावर भवितव्य अवलंबून

रत्नागिरी, ता. २८ ः प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या तर रिक्त पदांची संख्या वाढणार आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन बदल्या करण्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर एकूण १८०८ पदे रिक्त होतील.
आंतरजिल्हा बदल्या झालेल्या शिक्षकांना ३० एप्रिलपर्यंत कार्यमुक्त करावे, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी केल्यास रत्नागिरीतील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. गेल्या १२ वर्षात प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जिल्ह्यात सध्या १०९१ हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही परिस्थिती असताना आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्‍या शिक्षकांची त्यामध्ये भर पडत आहे. यंदा ७१७ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने सोडण्यासाठी शासनाचा निर्णय आहे. यापूर्वी शासनाने दहा टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त असतील तेथे शिक्षकांना सोडू नये असे आदेश होते; परंतु सरकारने तो नियम शिथिल करून दोन महिन्यापूर्वी नव्याने निर्णय घेतला आहे.
शासनाचे आदेश आल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाकडून तत्काळ कार्यवाहीला सुरवात केली आहे. शिक्षण विभागाकडून फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. बदलीसाठीच्या शासन निर्णयामध्ये विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन शिक्षकांना कार्यमुक्त करा, असे वाक्य नमूद केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याची रिक्त पदे आणि शिक्षकांना सोडल्यानंतर होणारी रिक्त पदे याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याचा विचार करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारीही सकारात्मक आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती ग्रामविकास विभागासह शिक्षण विभागाला अवगत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासनाकडे मार्गदर्शन मागवले असून त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे. याला सीईओंनी दुजोरा दिल्यामुळे मार्गदर्शनावरच आंतरजिल्हा बदल्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
----
शिक्षकांच्या पदांची स्थिती
* मराठी माध्यम मंजूर पदे - ६ हजार ६८९
* रिक्त पदे-१ हजार ००१
* उर्दू माध्यम मंजूर पदे -४७७
* रिक्त पदे- ९०
* एकूण रिक्त पदे-१ हजार ९१