गुहागर- बनावट कुलमुख्यत्यार बनवून 43 लाखाला टोपी

गुहागर- बनावट कुलमुख्यत्यार बनवून 43 लाखाला टोपी

बनावट कुलमुख्यत्यार बनवून
४३ लाखांची फसवणूक

जमिनीची परस्पर विक्री; शृंगारतळीतील दलालांचे कृत्य

गुहागर, ता. २८ : बनावट कुलमुख्यत्यार पत्र बनवून ४३ लाख ६० हजार रुपयांना परस्पर जागा विकून मूळ जागा मालकाची फसवणूक केल्याची घटना शृंगारतळीमध्ये घडली आहे. या घटनेची फिर्याद अब्दुल मुतल्लीब ताज अहमद साल्हे यांनी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. हा सर्व प्रकार गुंतागुंतीचा असल्याने अधिक तपास गुहागरचे प्रभारी पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते करत आहेत.
अब्दुल साल्हे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, सध्या ते नालासोपारा येथे राहातात. त्यांचे मूळ गाव शृंगारतळी. येथे त्यांची जमीन आहे. केवळ सणावाराला शृंगारतळीत येणाऱ्या अब्दुल साल्हे यांना आपली जमीन विकायची होती. त्यासाठी त्यांनी शृंगारतळीतील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या ३ दलालांना सांगितले. शृंगारतळीत कायम येणे जाणे होत नसल्याने जमीन खरेदी विक्रीसाठी अब्दुल साल्हे यांनी या दलालांना कुलमुख्यत्यार पत्रही बनवून दिले होते.
दरम्यानच्या काळात या कुलमुख्यत्यार पत्रावरील एक हिस्सेदार मृत झाला. याचा फायदा घेऊन तिन्ही दलालांनी एकमेकांच्या संगनमताने सर्व ठिकाणी एकमेकांना साक्षीदार राहून स्वतःच्या नावे दुसरे कुलमुख्यत्यार पत्र तयार केले. अब्दुल साल्हे यांच्या शृंगारतळीतील भूमापन क्र. ६४ या जागेची विक्रीदेखील केली. या विक्रीमधून मिळालेले ४३ लाख ६० हजार रुपये हे खरेदीदाराला तिघांच्या बँक खात्यात पाठवण्यास सांगितले. हा व्यवहार २९ जानेवारी २०२२ ते २१ एप्रिल २०२२ दरम्यान झाला.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अब्दुल साल्हे यांना जमिनीचा व्यवहार झाल्याचे कळले. त्यांनी दलालांकडे खरेदी खताची मागणी केली. मात्र खरेदी खत देण्यास या तिन्ही दलालांनी टाळाटाळ सुरू केली. अधिक माहिती घेतल्यावर अब्दुल साल्हे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वेगवेगळ्या मार्गाने अब्दुल साल्हे यांनी या तिघांकडे वर्षभर जमिनीच्या व्यवहारांचे पैसे आणि खरेदी खत मागितले; मात्र तिघांनी अब्दुल साल्हे यांना दाद लागून दिली नाही. त्यामुळे अखेर अब्दुल साल्हे यांनी गुहागर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com