काजू दर घसरणीविरुध्द मोर्चा

काजू दर घसरणीविरुध्द मोर्चा

92208
वैभववाडी ः येथील बाजारपेठेत काजू बी दर घसरणीविरोधात मोर्चा काढण्यात आला.


‘काजूला प्रतिकिलो १५० रुपये द्या’

उत्पादकांची मागणी; दर घसरणीविरुद्ध वैभववाडीत मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २९ ः काजू बी दर घसरणीवरून वैभववाडीतील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज (ता. २९) शहरात मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले. काजूला प्रतिकिलो १५० रूपये दर मिळावा, आयात शुल्कात वाढ झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शासनाने काजू बी दर प्रकरणात लक्ष न घातल्यास पुन्हा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.
काजू बीचा दर प्रतिकिलो १०५ रुपयांवर घसरला आहे. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या मिळत असलेल्या काजू बी दरातून उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे संतप्त झालेले काजू उत्पादक शेतकरी आज वैभववाडीतील संभाजी चौकात एकवटले. तेथे जोरदार घोषणाबाजी करीत संभाजी चौक ते दत्तमंदिर असा मोर्चा काढण्यात आला. ‘काजू बीला १५० रुपये दर मिळालाच पाहिजे’, ‘संघटित व्हा संघटित व्हा, काजू बागायतदारांनो संघटित व्हा’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर बागायतदारांची दत्तमंदिरात बैठक झाली. या बैठकीत बागायतदार विलास देसाई यांनी भूमिका मांडली. बागायतदार एकवटल्याशिवाय शासन दखल घेणार नाही. सध्या मिळत असलेल्या दरातून उत्पादन खर्च देखील भागत नाही. त्यामुळे काजू बागायतदार कर्जबाजारी होत आहे. शासनाने आयात शुल्कात वाढ करावी, जिल्ह्यातील ‘जीआय’ मानांकन काजूच्या ब्रॅंडींग करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. शासनाचे दरवाजे ठोठावले नाही तर शासन काजू बागायतदारांकडे कधीच लक्ष देणार नाही. कारखानदार आणि व्यापारीच काजू बीचा दर ठरवितात. त्यामुळे काजू बीचे दर ठरविणारी यंत्रणा उभी झाली पाहिजे.
--
बाजार समितीचे वेधले लक्ष
जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. असंघटित काजू बागायतदारांमुळे काजू बीचे दर घसरत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काजू बी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वजन काट्यांची देखील तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही नगरपंचायतीकडे करण्यात आली. यावेळी काजू बागायतदार विजय रावराणे, महेश रावराणे, सुनील रावराणे, मंगेश कदम, इंद्रजित परबत्ते, मोहन चव्हाण आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com