कोकणातील दत्त उपासना

कोकणातील दत्त उपासना

(२३ मार्च टुडे चार)

जनरिती- भाती लोगो

फोटो ओळी
-rat२९p७.jpg ः
९२१०७
डॉ. विकास शंकर पाटील
-
कोकणातील दत्त उपासना

कोकणपट्ट्यात आज दत्तमंदिरांची संख्या मोठी दिसत असली तरी ही सारीच मंदिरे खूप जुनी नाहीत. काही मंदिरे ही अलीकडल्या काळात निर्माण झालेली दिसतात. असे असले तरी कोकणात दत्त उपासना खूप जुन्या काळापासून चालत आल्याचे दिसते. कोकणातील जुन्या मंदिरात दत्तमूर्तीऐवजी पादुका स्थापिलेल्या दिसतात. मुस्लिम सत्ता ऐन बहरात असताना दत्त संप्रदाय अस्तित्वात आला होता. मुस्लिम सत्ताधीशांकडून हिंदू मूर्तींची होणारी विटंबना लक्षात घेऊन तत्कालीन दत्त सांप्रदायिकांनी दत्तमूर्तीऐवजी दत्ताच्या पादुकांची प्रतिष्ठापना करणे गरजेचे मानले होते. त्यातूनच प्राचीन दत्तमंदिरांमध्ये मूर्तीच्या ठिकाणी पादुकाच असलेल्या दिसतात. याउलट अलिकडल्या कालखंडात जी मंदिरे निर्माण केली गेली तिथे दत्तमूर्ती असल्याचे दिसते. कोकणात काही दत्तमंदिरात पादुकांची प्रतिष्ठापना, काही ठिकाणी त्रिमूर्तीची प्रतिष्ठापना तर सावंतवाडीसारख्या ठिकाणी एकमुखी दत्ताची मूर्ती केल्याचे दिसते.
कोकणात माणगाव, तळवडे, पाटगाव, मठ, रायपाटण अशा अनेक गावी प्राचीन दत्तमंदिर आणि दत्त सांप्रदायिकांचे मठही दिसून येतात. तिथे दत्त उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. याबरोबरच त्या परिसराच्या भोवतालच्या गावातही दत्त उपासकांची संख्या लक्षणीय दिसते. टेंबे स्वामींच्या सहवासाने पवित्र झालेल्या आणि दत्तोपासनेचे केंद्र बनलेले माणगाव हे खूप मोठे आध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असणारे यक्षिणीदेवीचे मंदिर हे इतरत्र कोठेही आढळत नाही, ते माणगावात आढळते. या संदर्भात एक आख्यायिका ऐकायला मिळते. नृसिंह सरस्वती स्वामी नृसिंहवाडीला असताना त्यांनी यक्षिणीदेवीस आपला पुढील अवतार माणगावी होणार असून, त्या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही. तेथे जाऊन भूतपिशाच्यांचा प्रबंध करून तेथे मनुष्यवस्ती वाढवावी, असा आदेश दिला होता. त्या आदेशानुसारच यक्षिणीदेवी माणगावला आली. तिने भगवान शंकरांना तेथे मनुष्यवृत्ती वाढवण्याची विनंती केली. शंकराने वेताळाला बोलावून मनुष्यवस्तीला त्रास न देता राहावे, असा आदेश सोडला. तेथे शिवलिंगाची स्थापना स्वतः शंकरांनी केली. त्यानंतर हळूहळू मनुष्यवस्ती वाढली. पुढे १३ ऑगस्ट १८५४ ला टेंबेस्वामींचा जन्म झाला आणि माणगावप्रती गाणगापूर बनले. बालपणापासूनच स्वामी विरक्त वृत्तीचे आणि कडकडीत आचारधर्म पाळणारे होते. त्यांनी काही काळ माणगावात वास्तव्य केले आणि दत्त महाराजांच्या दृष्टांतानुसार त्यांनी भारतभर भ्रमंती केली. भागवत संप्रदायात संत तुकारामांना कळस होण्याचा मान मिळाला. त्याप्रमाणे दत्त संप्रदायाचा कळस होण्याचा मान वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींना लाभला. गुरू आज्ञेने त्यांनी माणगाव येथे श्री गुरू दत्तात्रेयांची द्विभूज मूर्ती स्थापन करून तेथे छोटे दत्तमंदिर उभारले. त्याबरोबरच आपल्या राहत्या घरी श्री दत्तगुरूंच्या पादुकांची स्थापना केली. टेंबेस्वामींनी दत्त आराधनेची सुरवात माणगावात केली आणि ती कोकणात अविरतपणे सुरू राहिली.
पोंभुर्ले-पाटगाव सीमेवरील दत्तमंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. या दत्तमंदिरातील पादुकांचे दर्शन प्रथम धनगर समाजातील मेंढपाळांना झाले. त्यांनी ही गोष्ट दादा महाराजांच्या शिष्याच्या निदर्शनास आणून दिली. श्री दादा महाराज वैद्य यांनी स्वतः या ठिकाणी येऊन त्या पादुकांच्या संदर्भात खात्री करून घेतली आणि मग त्यांची विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली. येथे दत्तजयंतीस मोठा उत्सव होतो. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रासह, मुंबई, गोवा व बेळगाव इथूनही भक्तगण हजेरी लावतात. लांजा शहरापासून जवळच असणाऱ्या आंजणारी पुलानजीक काजळी नदीच्या काठीमठ येथे अतिशय रमणीय अशा परिसरात स्वयंभू दत्तस्थान आहे. सांगली-मिरज परिसरातील सिद्धपुरुष श्री उदयन तथा डेव्हिड महाराज यांच्या प्रेरणेतून श्री अवधुतानंद महाराजांना या जागृत दत्तस्थानाचा साक्षात्कार झाला. श्री अवधुतानंद महाराजांनी तीन फुले वाहत्या पाण्यात सोडली. ती फुले वाहत्या पाण्यासोबत वाहत न जाता काठाला विशिष्ट ठिकाणी थांबली. या चमत्कारातून दत्ताचे असणारे अस्तित्व ग्रामस्थांना दाखवून दिले. त्यानंतर त्या ठिकाणी ग्रामस्थांकडून मंदिर बांधण्यात आले. श्री अवधूतानंद महाराजांकडून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. हे क्षेत्र प्रति नृसिंहवाडी म्हणून ओळखले जाते. दत्तदास दहिवलकर महाराज यांनी रायपाटण गावी श्री दत्त पादुकांची प्रतिष्ठापना करून ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या रायपाटण गावाला पुन्हा प्रकाशझोतात आणले आहे. बांबरकर महाराज यांनी आपल्या गुरूकडून लाभलेला हा अमूल्य ठेवा पुढे तितक्याच ताकतीने चालवला. रायपाटण गावचा हा मठ परिसरातील दत्तोपासनेसाठी प्रती गाणगापूर म्हणून ओळखला जातो. तळवडे गावी असणारे प्राचीन दत्तमंदिर भाविकांना मंत्रमुग्ध करणारे आहे. अर्जुना नदीच्या तिरावर असणारे हे पुरातन दत्तमंदिरातील पादुकांवर डोके टेकल्यावर खूप मोठे समाधान भाविकांना लाभते. कोकणात निसर्गाच्या सान्निध्यात असणारी ही दत्तमंदिरे भाविकांच्या श्रद्धेची आणि भक्तीची स्थाने आहेत. कोकणातील ही दत्तोपासना अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय बनली आहे.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com