सिंधुदुर्गात लवकरच विज्ञान केंद्र

सिंधुदुर्गात लवकरच विज्ञान केंद्र

92159
सावंतवाडी : विज्ञान अभ्यास सहलीस शुभेच्छा देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष पांडुरंग काकतकर आदी.

सिंधुदुर्गात लवकरच विज्ञान केंद्र

मंत्री दीपक केसरकर; अभ्यास सहलीचे केले कौतुक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः सिंधुदुर्गातील शिक्षकांसाठी लवकरच आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत होण्यासाठी कोडींगचा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही जिल्ह्यात विज्ञान केंद्रनिर्मितीसह विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राष्ट्रीय आविष्कार अभियान २०२२-२३ अंतर्गत राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर पुरस्कृत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्ह्यातील निवडक माध्यमिक शाळांमधील नववीतील विज्ञान विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
या सहलीत जिल्ह्यातील वैज्ञानिक माहिती देणारी केंद्रे व विविध उद्योग संस्थांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये पंचम खेमराज महाविद्यालयातील प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या प्रयोगशाळा, फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथील फळ बागायतीची विविध तंत्रे, कुडाळ औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योगधंदे, प्रदूषण तसेच हवा, पाणी, माती यांचे परीक्षण विषयक माहिती देणारी गडार्क टेस्टींग लॅब, वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथील विविध प्रयोगांची माहिती देण्यात आली.
या उपक्रमाचे नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या अनुपमा तावशीकर यांच्या अध्यक्षतेखाली व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सचिव प्रकाश कानुरकर, उपाध्यक्ष रघुनाथ कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यात वाहतूक नियोजन कणकवली तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी केले. तसेच सत्यपाल लाडगावकर (देवगड), अनंत साईल (कुडाळ), संजय तुळसकर (वैभववाडी), ऋषिकेश गावडे, (सावंतवाडी), मिलिंद गावकर (मालवण), संतोष पवार, नेहा सावंत (वेंगुर्ले), राजाराम फर्जंद (दोडामार्ग) यांनी तालुका समन्वयक तसेच मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
--
‘डाएट’तर्फे राबविलेला उपक्रम कौतुकास्पद
जिल्हा विज्ञान मंडळ तसेच ‘डाएट’तर्फे राबविलेला हा उपक्रम हा राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आदर्शवत असल्याचे केसरकर म्हणाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सहलीत सहभागी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन कौतुक केले व विज्ञान मंडळाच्या अशा विविध उपक्रमांना यापुढेही सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com