
माडखोलमधील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
92325
कृष्णा पालव
माडखोलमधील तरुणाची
गळफास घेऊन आत्महत्या
सावंतवाडी, ता. २९ ः माडखोल-टेंबवाडी येथील कृष्णा चंद्रकांत पालव (वय २८) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. नातेवाईकांनी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
घटनेची अधिक माहिती अशी, कृष्णा हा गोव्यात कामाला होता. तेथून तो काल (ता.२८) आपल्या घरी परतला. आज सकाळी त्याचे वडील गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते तर आई घरकाम करत होती. यावेळी त्याने आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाला हाक मारल्यानंतरही त्याच्याकडून प्रतिसाद न आल्याने आईने खोलीत जाऊन पाहणी केली असता ही घटना समोर आली. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले; मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.