संस्थान आचरा गावात रामजन्मोत्सव उत्साहात

संस्थान आचरा गावात रामजन्मोत्सव उत्साहात

swt3018.jpg
92462
आचराः संस्थान मानकऱ्यांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सव साजरा झाला.

संस्थान आचरा गावात
रामजन्मोत्सव उत्साहात
आचरा, ता. ३०ः ऐन मध्यान्हीच्या समयी रामदासी बुवांचे कीर्तन रंगात आले असताना सर्वांची लगबग वाढली, मंगल घटिका भरली आणि ''जय जय रघुवीर समर्थ''चा जयघोष आसमंतात दणाणला. गुलालाची उधळण झाली आणि ढोलताशा-सनईचा एकच स्वर निनादला, ''राम जन्मला गं सखे राम जन्मला!''
गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या संस्थान आचरा गावच्या रामजन्मोत्सवातील हा क्षण ''याची देही याची डोळा'' अनुभवण्यासाठी रामेश्वर मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. रामजन्मोत्सवानंतर गुलाल उधळत, ढोलताशा- बँड पथकाच्या गजरात बाळ रामाच्या गोजिरवाण्या मूर्तीची सरंजामासहीत रामेश्वर मंदिराला परिक्रमा झाली. यावेळी वाद्यांचे मंगलमय स्वर आणि रामजन्मोत्सव महिमा गीतांचे मंगल स्वर संस्थानच्या प्रांगणात निनादत होते.
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या या संस्थानी थाटाच्या सोहळ्यास गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. रघुवीर आरती, गवई गाणे, सायंकाळचे मंगल स्नान, माखन, दरबारी गायन, रात्री पालखी सोहळा, कीर्तन अशा दैनंदिन कार्यक्रमांत हा सोहळा आज उत्साहात साजरा झाला. रामनवमीच्या पूर्वरसंध्येला राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांनी, तर रामनवमी दिवशी सायंकाळी निराली कार्तिक यांनी आपल्या गायन सेवेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी देवस्थान समिती,मा नकरी, ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेत महाप्रसादाची व्यवस्था केली. याचा लाभ घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. देवस्थान समिती, मानकरी, ग्रामस्थांच्या नियोजनातून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com