नापणे ऊस संशोधन केंद्राला ८९ लाख

नापणे ऊस संशोधन केंद्राला ८९ लाख

21520

नापणे ऊस संशोधन केंद्राला ८९ लाख

अर्थसंकल्पात तरतूद; ऊस तंत्रज्ञानावर होणार संशोधन

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता.१ ः शासनाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला जाहीर केलेल्या ५० कोटींपैकी २५ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नव्याने स्थापन केलेल्या नापणे ऊस संशोधन केंद्रासाठी शासनाने ८९ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे आता कोकणातील वातावरणाला पोषक उसाच्या जातीची निवड, आंतरपिके, काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रकिया या संशोधन कामांना गती प्राप्त होणार आहे.
राज्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या दोन विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना संशोधनाकरिता प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दापोली कृषी विद्यापीठाकडून विविध १३ विषयांवरील संशोधनासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. शासनाकडून या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून २५ कोटींच्या निधी खर्चास मान्यता दिली आहे. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या नापणे ऊस संशोधन केंद्रासाठी ८९ लाखांचा निधी मंजूर झाला केला आहे. कोकणातील वातावरणाला पोषक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड, आंतरपिके, काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रकिया संशोधन करणे, पूर्वमशागत, लागवड पध्दती, आंतरमशागत, पाणी, खोडवा, एकात्मिक अन्नद्रव्य, तण व एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन संशोधन करणे या कामांना आता निधी प्राप्त झाल्यामुळे गती प्राप्त होणार आहे. ऊस संशोधन केंद्राला मंजुरी मिळाल्यानंतर तीन वर्षे झाली आहेत. पुरेसा निधी नसताना ऊस रोप निर्मिती, चार सरी पध्दत लागवडीवर या केंद्रांमार्फत काम सुरू आहे; मात्र निधीअभावी इतर संशोधन करण्यात अडथळा निर्माण होत होता. आता निधी प्राप्त होणार असल्यामुळे या केंद्रावरील कामांना गती मिळणार आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांत ऊस लागवड क्षेत्रात घट झाली आहे. याशिवाय एकरी उत्पादन १५ ते १७ टन असल्यामुळे ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे येथील वातावरणाला पोषक जाती आणि लागवड व्यवस्थापनावर संशोधन होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
दरम्यान, दापोली विद्यापीठाला २५ कोटीचा निधी विविध १३ प्रकल्पांसाठी दिला आहे. यामध्ये बदलत्या वातावरणाचा कोकणातील विविध पिकांवर होणाऱ्या अनिष्ट परिणामावर संशोधन होणार आहे.
.................
*कोष्टक
प्रकल्पाचे ठिकाण*निधी
कृषी संशोधन केंद्र कर्जत*४ कोटी ४१ लाख
वनशास्त्र महाविद्यालय दापोली*४ कोटी २ लाख
कृषी विद्या विभाग दापोली*२ कोटी ५० लाख
कृषी अर्थशास्त्र विभाग दापोली*७३ लाख
सुपारी संशोधन केंद्र दिवेआगर*३६ लाख
खार जमीन संशोधन केंद्र गिरणे*३ कोटी ६ लाख
नापणे ऊस संशोधन केंद्र*८९ लाख
जैवतंत्रज्ञान कक्ष दापोली*१ कोटी
कृषी रसायनशास्त्र व मृदशास्त्र*१ कोटी
संशोधन संचालनालय दापोली*६ कोटी
बियाणे विभाग दापोली*३५ लाख
वनशास्त्र महाविद्यालय दापोली*६८ लाख
.................
पॉईंटर
काही ठळक बाबींवर एक नजर
*भाताच्या वाणांवर संशोधन होणार
* फळे, फुले, भाज्यांसह औषधी वनस्पतीवर संशोधन होणार
* पिकांपासून चरबी, लिपीड व तेल काढण्यावर संशोधन
* अचूक शेती व्यवस्थापनाकरिता संशोधन
* पणन विषयक इतर बाबींचा अभ्यास करणे
* सुपारीवर आधारीत पीक पध्दतीचा अभ्यास करणे
* लागवड, काढणी पश्चात तंत्रज्ञान, मूल्यवर्धन तंत्र विकसित करणे
* मीठ सहिष्णू तांदळाच्या बियाण्यांच्या मुबलक पुरवठा, क्षारयुक्त जमिनीचे योग्य व्यवस्थापन करणे,
* आंबा, काजू, कोकम, कंदपीक यांचे व्यावसायिक मानकीकरण करणे
* लाल, सफेद वेलची केळी आणि टिश्युकल्चरमध्ये उद्योजकतेचा विकास करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com