
अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघांना अटक
अल्पवयीन मुलींवर अत्याचार
केल्याप्रकरणी तिघांना अटक
दोडामार्ग पोलिसांत तीन फिर्यादी, ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा
दोडामार्ग, ता. १ ः दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या दोन वेगवेगळ्या घटना येथील पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. याप्रकरणी तिघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तीनपैकी एक दोडामार्ग तालुक्यातील तर, अन्य दोघे संशयित गोवा व कर्नाटक राज्यातील आहेत. संशयितांना अटक करून आज न्यायालयात हजार करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.
या प्रकरणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, काल (ता. ३१) येथील पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यातील एक अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. एका प्रकरणात गोव्यातील संशयिताने पीडितेवर जवळपास दीड वर्षे अत्याचार केले. याबाबतची फिर्याद पीडितेच्या नातेवाईकाने पोलिस ठाण्यात दिली. यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलगी व संशयित या दोघांची सोशल माध्यमाद्वारे ओळख झाली. तो कर्नाटकातील रहिवासी आहे. पीडितेला त्या युवकाने आपल्या मावशीच्या घरी नेऊन अनेकदा अत्याचार केले. तसेच दोडामार्ग तालुक्यातील एका युवकानेही पीडितेशी ओळख करून तिचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. जुळलेल्या अनैतिक संबंधातून ती अल्पवयीन गर्भवती राहिल्याने ही बाब घरच्यांच्या निदर्शनास आली. घरच्यांनी पीडितेला घेऊन पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्या फिर्यादीवरून संशयितांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. यातील एकाला काल पोलिसांनी अटक केली. तर दुसरा संशयित पसार होता. त्याला रत्नागिरी-दापोली येथे जाऊन दोडामार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर व हवालदार अनिल पाटील यांनी आज ताब्यात घेतले. तिघांनाही आज जिल्हा न्यायालयात हजर केले. तिघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.