वाशीत हापूसचे दर तिनशे रुपयांनी वधारले

वाशीत हापूसचे दर तिनशे रुपयांनी वधारले

फोटो ओळी
rat६p१६.jpg-KOP२३L९४०२२ रत्नागिरी ः बागेतून काढलेला आंबा


वाशीत हापूसचे दर तिनशे रुपयांनी वधारले
आवक घटली; १५ एप्रिल ते १० मे पर्यंत उत्पादनात तुट
रत्नागिरी, ता. ६ ः आरंभीच्या बहरातील आंबा संपुष्टात आल्यामुळे वाशी बाजारातील आवक कमी झाली आहे. परिणामी हापूस आंब्याचा पाच डझनच्या पेटीचा दर २०० ते ३०० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दर्जेदार फळासाठीच दर वाढला असला तरीही यंदा मुळातच उत्पादन कमी असल्याने या दर वाढीचा फायदा थोड्याच बागायतदारांना मिळणार आहे.
कोकणातील आंब्याचे वाशी बाजारातील आगमन तुलनेत यंदा लवकर झाले. फेब्रुवारीच्या अखेरीस बर्‍यापैकी पेट्या वाशीमध्ये विक्रीला पाठवल्या गेल्या. गुढीपाडव्यानंतर आंब्याच्या पेट्यांची संख्या पन्नास हजारावर पोहचली होती; परंतु गेल्या आठ दिवसांमध्ये आवक घटली असून सुमारे दहा ते बारा हजार पेट्या कमी दाखल होत आहेत. गुरुवारी (ता. ६) ३५ हजार पेट्यांची नोंद झाली आहे. यामध्ये रत्नागिरीतून चाळीस टक्के तर उर्वरित सिंधुदुर्ग, रायगडमधील पेट्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी वाशीतील दलाल आणि रत्नागिरीतील आंबा बागायतदार यांच्यात झालेल्या बैठकीत हापूसचे दर स्थिर राहावेत अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळीही आवक कमी झाली की दर वाढतील असे दलालांकडून सांगण्यात आले. आंबा कमी येऊ लागल्यामुळे ४ हजार रुपयांना मिळणारी पाच डझनची पेटीला चार हजार तिनशे रुपये द्यावे लागत आहेत. वाढ कमी असली तरीही यंदा प्रथमच असा बदल झाल्याचे बागायतदार सांगत आहेत.
हवामानातील बदलांमुळे यंदा दुसर्‍या टप्प्यातील बहरात अपेक्षित उत्पादन बागायतदारांच्या हाती आलेले नाही. थ्रिप्ससह उन्हाच्या कडाक्यामुळे फळगळ झाली. त्याचा परिणाम हळूहळू जाणवू लागला असून १५ एप्रिलनंतर उत्पादन कमी असल्याचे जाणवणार आहे. दलालांनी सध्या उपलब्ध आंब्याला दर वाढवून दिला असला तरीही त्याचा फायदा मोजक्याच बागायतदारांना होणार आहे.

चौकट
‘र्थ्रिप्स’वर केकेव्हीने संशोधन करावे
कडाक्याचा उन्हाळा आणि त्यानंतर अचानक पडलेली थंडी, अवकाळी पाऊस अशा वातावरणामुळे आंबा गळ, फळावर र्थ्रिप्सचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झाला आहे. महागडी औषधे फवारुनही थ्रिप्स नियंत्रणात आणता आलेला नाही. भविष्यात आंबा व्यावसाय टिकवून ठेवायचा असेल तर कोकण कृषी विद्यापिठाकडून यावर संशोधन करणे गरजेचे आहे, असे आंबा बागायतदारांकडून सांगितले जात आहे.

कोट
आवक कमी झाल्यामुळे दर्जेदार फळासाठीचे हापूसचे दर वाढविण्यात आले आहेत. ही आवक पुढील काही दिवस कमी राहण्याची शक्यता आहे. सध्या ३५ ते ३८ हजार पेट्याच कोकणातून वाशीत येत आहेत.
- संजय पानसरे, संचालक, बाजार समिती, वाशी

कोट २
हवामानातील बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर झालेला आहे. यंदा जमेची बाजू कमी आणि खर्च अधिक असे चित्र आहे. औषधांचा खर्च आणि बँकांची कर्ज फेडतानाही बागायतदारांना कसरत करावी लागेल.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com