
साडेतीन हजार कासवांची पिल्ले झेपावली समुद्रात
संग्रहित-PNE19P58595
साडेतीन हजार कासवांची पिल्ले झेपावली समुद्रात
चार किनाऱ्यांवरील स्थिती; कासवांची घरटी १५३
रत्नागिरी, ता.९ ः समुद्र किनाऱ्यावरील कासवमित्रांमुळे आणि नागरिकांमध्ये झालेल्या जागृतीमुळे वनविभागाच्या कासव संर्वधन मोहिमेला आता मोठे बळ मिळत आहे. रत्नागिरीतील मालगुंड, गावखडी तर राजापूरमधील वेत्ये व माडबन किनाऱ्यावर यंदा १५३ कासवांची घरटी आढळली. त्यामध्ये १५ हजार ८२६ अंडी असून, आतापर्यंत ३ हजार ५७४ कासवांना समुद्रात सोडण्यात आले.
मागील काही वर्षापासून ऑलिव्ह रिडले कासवाच्या बचावासाठी कोकणी माणूस सरसावला आहे. पूर्वी कासवांच्या अंड्यांची खाण्यासाठी चोरी होत असे; मात्र मंडणगडच्या वेळास समुद्रकिनाऱ्यावर निसर्गप्रेमी भाऊ काटदरे यांनी ग्रामस्थांच्या साथीने जनजागृती करत कासवांचे संरक्षण केले. त्यानंतर वनविभागाच्या मदतीने या ठिकाणी कासव महोत्सव भरवला जाऊ लागला. त्यानंतर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर कासव संरक्षणासाठी मोहीमच सुरू झाली. किनाऱ्यांवर ग्रामस्थ, तरुण स्वत:हून या कामात वनविभागाला साहाय्य करू लागले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील अनेक किनाऱ्यांवर त्यानंतर कासवांच्या घरट्यांचे संरक्षण करण्यात येऊ लागले. यावर्षी रत्नागिरीतील गावखडी व मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कासवांची घरटी आढळली आहेत. यात गावखडीमध्ये ७७ घरटी आढळली असून, त्यात ८ हजार १२७ अंडी तर मालगुंड समुद्रकिनारी ६० घरटी आढळली आहेत. यात ५ हजार ७७३ अंडी सापडली आहेत. गावखडी येथे आतापर्यंत १ हजार ५४४ तर मालगुंड येथे १ हजार ४५० पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. राजापूर तालुक्यातील वेत्ये येथे आठ तर माडबन समुद्रकिनाऱ्यावर आठ घरटी आढळली. त्यामध्ये वेत्ये येथे ८८८ तर माडबन येथे १०३८ अंडी सापडली. त्यातील वेत्ये येथून २४५ तर माडबन येथून ४३६ पिल्ले समुद्रात झेपावली. वनविभांगाच्या रत्नागिरीचे तालुक्याच्या वनाधिकारी प्रकाश सुतार व त्यांचे सहकारी, कासवमित्रांच्या मदतीने कासवांच्या घरट्यांचे संरक्षण व कासवांची पिल्ले सोडण्यापर्यंत लक्ष ठेवून असतात. रत्नागिरीच्या मालगुंड व गावखडी किनाऱ्यावर मागील दोन-तीन वर्षात कासवांच्या घरट्यांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी कासव महोत्सव भरवण्याच्यादृष्टीनेही वनविभाग प्रयत्नशील आहे.
पिल्ले जगण्याचे प्रमाण वाढतेय
यंदा मालगुंड किनाऱ्यावर कासव संवर्धनाच्यादृष्टीने चांगले प्रयत्न झाले आहेत. योग्यवेळी कासवांची हॅचरी केल्यामूळे अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाणही तुलनेत वाढले आहे. या किनाऱ्यावर सुमारे साठहुन अधिक घरटी कासवांची होती. त्यात सुमारे साडेपाच हजारहून अधिक अंडी मिळाली. हॅचरीतून सुमारे दीड हजार पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आली आहेत. पिल्ले जगण्याचे प्रमाण यंदा वाढल्याचे कासवमित्र ऋषिराज जोशी यांनी सांगितले.