हातिवले टोलनाका येथे आजपासून टोलवसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातिवले टोलनाका येथे आजपासून टोलवसुली
हातिवले टोलनाका येथे आजपासून टोलवसुली

हातिवले टोलनाका येथे आजपासून टोलवसुली

sakal_logo
By

पान १ साठी
९४८६१


हातिवलेत आजपासून टोलवसुली
पुन्हा येणार संघर्षाला धार; राजापूरवासीयांचा आंदोलनाचा इशारा
राजापूर, ता. १० ः मुंबई-गोवा महामार्गाचे राजापूर तालुक्यातील काम पूर्ण झाले नसताना हातिवले टोलनाका येथे उद्या (ता. ११)पासून टोलवसुली सुरू होणार आहे. टोलवसुली सुरू करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी यापूर्वी दोनवेळा हाणून पाडलेला आहे. असे असताना पुन्हा एकदा हातिवले नाका येथे टोलवसुली करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिकांच्या मागण्या मान्य न करता टोल वसुलीला सुरुवात झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकावासीयांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
टोलनाक्याचे काम पूर्ण झाले असून, वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. संबंधित कंपनीसाठी १ जून २०२२ पासून या टोलनाक्यावर टोलवसुलीला करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले होते; मात्र सर्वच पक्षांनी त्याला विरोध केल्याने टोल वसुली थांबवली होती. त्यानंतर दोनवेळा संबंधित कंपनीने टोल वसुली करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजापूरवासीयांनी तो हाणून पाडला. डिसेंबर २०२२ मध्ये पोलिस बंदोबस्तात टोल वसुलीला सुरुवात केली होती. त्या वेळी तालुकावासीयांनी उग्र आंदोलन छेडत टोलनाक्यावर ठिय्या मांडला होता. माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनीही आंदोलनस्थळी येत प्रशासन व ठेकेदार कंपनीला चांगलेच धारेवर धरले होते. त्या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांनी लवकरच टोल वसुलीबाबत बैठक आयोजित करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असून, तोपर्यंत टोलवसुली स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केले होते.
महामार्गाचे अपुरे असलेले काम पूर्ण करावे, अनेक शेतकऱ्यांचे रखडलेले मोबदले मिळावेत, टोलनाक्यावरील कर्मचारी नियुक्तीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे. तसेच तालुक्यातील वाहनांना टोलमाफी मिळावी, अशा स्थानिकांच्या मागण्या असून, त्या पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करण्यात येऊ नये, अशी स्थानिकांची भूमिका आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘आम्ही उद्यापासून टोल सुरू करतोय. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला पत्र दिले आहे.’’

कोट
माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडल्यानंतर टोलवसुली थांबवली होती. त्या वेळी स्थानिकांच्या टोलबाबत असलेल्या मागण्यांवर चर्चा करून नंतरच टोलवसुलीला सुरुवात होईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती; मात्र आता स्थानिकांना विश्वासात न घेता टोलवसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. केवळ राजापूर तालुक्याला कोणी वाली नाही म्हणून बळजबरीने टोल वसुली होणार असेल तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
- अरविंद लांजेकर, सरचिटणीस, भाजप, राजापूर तालुका

कोट
हातिवले टोलनाका सुरू करण्याचा निर्णय नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून घेतला आहे. मंगळवारी (ता. ११) हा टोलनाका सुरू होईल. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या कोल्हापूर येथील कार्यालयाकडून टोलनाक्याचे मॉनिटरिंग केले जाणार आहे. मागील आठवड्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा टोलनाका सुरू करण्याबाबतची पूर्वसूचना देण्यात आली होती.
- अतुल शिवनिवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग खारेपाटण