
सिंधुदुर्गनगरीत नवोदित वकिलांसाठी कार्यशाळा
swt१११६.jpg
95076
ओरोसः येथे पत्रकार परीषदेत बोलताना बार कौन्सिल सदस्य अॅड. संग्राम देसाई व अन्य.
सिंधुदुर्गनगरीत नवोदित वकिलांसाठी कार्यशाळा
रविवारी आयोजनः महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ः जिल्ह्यातील नवोदित वकिलांना मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्यावतीने रविवारी (ता. १६) सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेस दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालय व मुंबई येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार असून या प्रांतातील नवोदित वकील वर्गाला सामाजिक, राजकीय व घटनात्मक जबाबदारीबाबत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या वतीने गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात विविध कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जिल्ह्यातील वकील वर्गाला मार्गदर्शन केले. रविवारी होत असलेल्या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद झाली. त्यावेळी अॅड. देसाई बोलत होते. यावेळी अॅड. अमोल सामंत-डिंगे, अॅड. विवेक मांडकुळकर, अॅड. यतीश खानोलकर, अॅड. महेश शिंपूगडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सानप, मकरंद कर्णिक, आर. एन. लड्डा, वाल्मिकी मिनीजीस, भरत देशपांडे हे न्यायमूर्ती व राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांची विशेष उपस्थिती आहे. बार कौन्सिलच्यावतीने नवोदित वकिलांसाठी ''कंटिन्यू लिगल एड एज्युकेशन प्रोग्रॅम'' घेण्यात येतो. पुणे येथील वकील श्रीकांत कानेटकर यांनाही मार्गदर्शनासाठी प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. सीबीआय, एनआयए व पोलिस दलाला सायबर इन्वेस्टीगेशनसाठी मदत करणारे श्री. कानिटकर सायबर विषयातील महत्त्वाचे मार्गदर्शन नवोदित वकिलांना करणार आहेत, असेही अॅड. देसाई यांनी यावेळी सांगितले.
भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नुकतेच क्रिमिनल व सिविल प्रॅक्टिस हॅन्डबिल प्रकाशित केले असून २०२२-२३ या काळात कार्यरत झालेल्या नवोदित वकिलांनाही मोफत पुस्तिकेचे वितरण या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. जसा पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आला, तसाच वकील वर्गासाठी संरक्षण कायदा असावा, अॅडवोकेट वेल्फर फंडची संकल्पना असून मुंबई येथील वकील वर्गांच्या मागणीनुसार भूखंड मिळावा, याबाबतची चर्चा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी झाली असून या प्रश्नाकडेही या कार्यशाळेत लक्ष वेधले जाणार आहे, अशी माहिती अॅड. देसाई यांनी दिली.
गोवा राज्यसह कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील वकील वर्ग व महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष जयंत भावे व बार कौन्सिलचे २४ सदस्य सिंधुदुर्गनगरी येथील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, असेही अॅड. संग्राम देसाई यांनी सांगितले.