शाळा, संस्थांमध्ये ‘संविधान जागर’

शाळा, संस्थांमध्ये ‘संविधान जागर’

96091
सावंतवाडी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना अॅड. नकुल पार्सेकर, अॅड. संतोष सावंत, भरत गावडे, अभिमन्यू लोंढे आदी.

शाळा, संस्थांमध्ये ‘संविधान जागर’

अॅड. संतोष सावंत; सावंतवाडीत ‘कोमसाप’चा उपक्रम

सावंतवाडी, ता. १५ ः भारतरत्न तथा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान, त्यांचे साहित्य, विचार आजच्या युवा पिढीला समजावेत, यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्यावतीने या वर्षभरात २६ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शाळा व संस्थांमध्ये ‘संविधान जागर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साहित्य चळवळ’, अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शाखाध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांनी दिली.
‘कोमसाप’तर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व त्यांच्या स्मृतीस अभिवादन कार्यक्रम पालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अध्यक्ष अॅड. सावंत व अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
अॅड. सावंत म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि खऱ्या अर्थाने लोकराज्य, लोकहक्क प्रस्थापित झाले; पण आज लोकशाही धोक्यात येत आहे की काय, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या युवा पिढीला संविधान समजायला हवे आणि त्यासाठी संविधान जागर अभियान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि साहित्य समजावे, यासाठी नव्या शैक्षणिक वर्षापासून तालुक्यातील अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना संविधान जागर व साहित्य चळवळ अभियान उपक्रम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील जवळपास १५ माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे आजच्या तरुणांना आणि आजच्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. काही सहकार तसेच शिक्षण आदी संस्थांमध्येही संविधान जागर केला जाणार आहे. या जागर माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वर्षभर साजरी करून खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करण्याचा मानस आहे.’’ यावेळी अॅड. पार्सेकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने लोकशाही रुजवली, तशी ती अधिक सक्षम होण्याची गरज असताना आज ती धोक्यात आल्याचे चित्र आहे, असे मत मांडले. यावेळी सचिव प्रतिभा चव्हाण, दीपक पटेकर, संतोष सावंत, विनायक गावस, अभिमन्यू लोंढे, भरत गावडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com