मालवण विकासाची गती मंदावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण विकासाची गती मंदावली
मालवण विकासाची गती मंदावली

मालवण विकासाची गती मंदावली

sakal_logo
By

swt१८१४.jpg
९६७७९
मालवण पालिका

swt१८१५.jpg
९६७८०
मालवणः शहरातील गटार व्हाळ्यांची साफसफाई अद्याप न झाल्याने पावसाळ्यात शहर तुंबण्याची भीती निर्माण झाली आहे.

swt१८१६.jpg
९६७८१
मालवणः वाहनतळाची माहितीच नसल्याने पर्यटकांकडून वाहनतळाचा वापरच होत नाही.

swt१८१७.jpg
९६७८२
मालवणः फोवकांडा पिंपळ पार येथील रंगीत कारंजा बंदावस्थेत आहे.

मालवण विकासाची गती मंदावली
प्रशासकिय कामकाजः शहरासमोर निर्माण झाला समस्यांचा डोंगर
प्रशांत हिंदळेकरः सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ः येथील पालिकेवर प्रशासकीय राजवटीचा सोळा महिन्यांचा कालावधी झाला आहे. या काळात स्वच्छतेसह पर्यटकांसाठीच्या सुविधांची वानवा, बंद पडलेले प्रकल्प यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील सगळ्यात मोठे पर्यटन ठिकाण असलेल्या या शहरासाठी प्रशासकिय राजवट विकास प्रवाह कुठेतरी मंदावणारी ठरली आहे. उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने पर्यटकांचा ओघ वाढला असून त्यांच्या मनोरंजनासाठी गतवर्षीप्रमाणे पालिका प्रशासन मालवण महोत्सव भरविणार का? असा प्रश्‍नही मालवणवासियांकडून विचारला जात आहे.
येथील पालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. गेल्या सोळा महिन्यांच्या कालावधीचा विचार करता गेल्या काही महिन्यात प्रशासनाकडून शहरातील विविध वाड्यांमधील दुरवस्था झालेल्या काही रस्त्यांच्या नुतनीकरणाचे काम मार्गी लावले आहे; मात्र शहरातील अन्य समस्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पर्यटनाची राजधानी म्हणून मालवण शहराकडे बघितले जाते. वर्षभरात लाखो पर्यटक मालवणला भेट देत येथील पर्यटनाचा आनंद लुटतात; मात्र गेल्या वर्षभरात पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या रॉकगार्डन येथील म्युझिकल फाउंटन, शहरातील मुख्य केंद्र असलेल्या फोवकांडा पिंपळ येथील रंगीत कारंजे बंदावस्थेत आहेत. पालिकेच्या माजी लोकप्रतिनिधींनी सातत्याने या प्रश्‍नी प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्यांच्याकडून आवश्यक कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

पावसाळ्यात शहर तुंबणार ?
पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्वसाधारणपणे फेब्रुवारीपासून शहरातील गटार, व्हाळ्यांची साफसफाई केली जात होती; मात्र यावर्षी एप्रिलचा पंधरवडा उलटून गेला असतानाही शहरातील गटार, व्हाळ्यांच्या साफसफाईचे काम पालिकेकडून हाती घेतलेले नाही. प्रत्यक्षात आंगणेवाडी यात्रा कालावधीनंतर शहरातील गटार, व्हाळ्यांच्या साफसफाईचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू होणे अपेक्षित होते. शहरातील गटारांची व व्हाळ्यांची संख्या पाहता सर्वसाधारपणे साफसफाईसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो; मात्र पावसाळा सुरू होण्यास दीड महिन्यांचा कालावधी राहिला असतानाही अद्यापही पालिकेकडून गटार, व्हाळ्यांच्या साफसफाईचे काम न झाल्याने शहरवासियांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी यावर्षी पावसाच्या सुरवातीच्या काळातच शहर तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कचरा व्यवस्थापन बिघडलेच
गेल्या काही वर्षात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या योग्य नियोजनामुळे शहरात सकाळच्या सत्रात शहरातील विविध वाड्यांमधील तसेच मुख्य बाजारपेठेच्या मार्गावरील व्यावसायिक, नागरिकांकडील कचरा उचलला जात होता; मात्र गेल्या दीड वर्षाच्या काळात पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका व्यावसायिकांना तसेच सर्वसामान्यांना बसत आहे. पूर्वी वेळेत कचरा उचलला जात असल्याने व्यवसाय सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छ असायचा; मात्र सध्या नऊ वाजल्यानंतर कचरा उचलणारा ट्रॅक्टर बाजारपेठेतील मुख्य मार्गावरील कचरा गोळा करण्यास येत असल्याने कचर्‍याची दुर्गंधी तर येतेच शिवाय ट्रॅक्टर वाटेत उभा असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. साधारपणे साडे अकरा वाजेपर्यत कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू असते; मात्र तोपर्यत बाजारपेठेतील व्यवसायास सुरवात झालेली असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने या समस्येकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिक, व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाहनतळ असून नसल्यासारखे
शहरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. बाजारपेठेत पर्यटकांना आपली वाहने उभी करून खरेदी करता येत नसल्याने अनेक समस्या भेडसावत होती. यावर मात करण्यासाठी शहरातील भरड भागात लाखो रुपये खर्च करून प्रशस्त वाहनतळ उभारण्यात आले आहे. हे वाहनतळ सुरू करण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेत लक्ष वेधल्यानंतर या वाहनतळाची प्रलंबित कामे मार्गी लावण्यात आली. या वाहनतळाचे रितसर उद्घाटनही करण्यात आले; मात्र या वाहनतळाची ज्या पद्धतीने पालिका प्रशासनाकडून प्रसिद्धी होणे गरजेचे होते तशी झाली नाही. परिणामी शहरात येणार्‍या पर्यटकांना या वाहनतळाची माहितीच नसल्याने त्याचा वापरच होत नाही. यासंदर्भात पालिका प्रशासनाने शहरातील व्यापार्‍यांशी चर्चा करून या वाहनतळाचा वापर होण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल? यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत.


मालवण महोत्सव भरविणार का?
उन्हाळी सुटीच्या काळात येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. येथील किल्ले सिंधुदुर्ग, रॉकगार्डन, जयगणेश मंदिर यासह विविध जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांकडून लुटला जातो; मात्र या पलिकडे अन्य मनोरंजनाच्या कोणत्याही सुविधा नसल्याने पर्यटक एक, दोन दिवसांचे पर्यटन करून माघारी परततो. या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी दांडी समुद्रकिनारी पालिकेच्या माध्यमातून भव्य मालवण महोत्सव भरविण्यात आला. या महोत्सवातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही मिळाली शिवाय अनेक छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना रोजगारही मिळाला. त्यामुळे या महोत्सवाचे सर्वांकडून कौतुकही झाले. असा महोत्सव यावर्षी मालवण पालिका भरविणार का ? असा प्रश्‍न शहरवासियांकडून विचारला जात आहे.

कोट
शहरातील गटार, व्हाळ्यांच्या साफसफाईची तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. आता एका ठेकेदाराने निविदा भरली असून येत्या दोन दिवसात संबंधितास कार्यारंभ आदेश दिला जाईल. वेळेत शहरातील गटार, व्हाळ्यांची सफाई केली जाईल. पालिकेच्या वाहनतळाचा पर्यटकांकडून वापर होत नाही ही वस्तुस्थिती आहे. यासाठी वाहनतळाची माहिती होण्यासाठी फलकांचा वापर करणे आवश्यक आहे; मात्र यासाठी पालिकेस आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. यासाठी जागा उपलब्ध झाल्यास फलक बसविण्याची कार्यवाही केली जाईल. गतवर्षी मालवण पालिकेने महोत्सव भरविला; मात्र यावर्षी महोत्सवाचे कोणतेही नियोजन नाही.
- संतोष जिरगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, मालवण पालिका

कोट
मालवण शहरातील भरड भागात पालिकेच्या माध्यमातून वाहनतळाची सुविधा निर्माण केली आहे; मात्र पुरेशा प्रसिद्धी अभावी याची माहिती पर्यटकांना न झाल्याने त्याचा वापर पर्यटकांकडून होत नाही ही वस्तुस्थिती आहे; मात्र येत्या काळात याबाबतची आवश्यक कार्यवाही पालिकेकडून केली जाईल. सध्या इलेक्ट्रीक बाईकचा जमाना आहे; मात्र शहरात अशा वाहनचालकांना तत्काळ आपले वाहन चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध नाही. याचा विचार करून या वाहनतळाच्या ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून हाती घेतले जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव प्रशासनास सादर केला आहे. त्यामुळे याचा फायदा इलेक्ट्रीक वाहनचालकांना घेता येणार आहे. अशी सुविधा देणारी मालवण पालिका ही जिल्ह्यातील पहिली पालिका ठरणार आहे.
- निखिल नाईक, शहर समन्वयक, मालवण पालिका