राज्य कर्मचाऱ्यांचा मेमध्ये महामोर्चा

राज्य कर्मचाऱ्यांचा मेमध्ये महामोर्चा

राज्य कर्मचाऱ्यांचा
मेमध्ये महामोर्चा
कणकवलीः शासनाने नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यात संप पुकारला होता. आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी याच मागणीसाठी १६ मे रोजी मंत्रालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नागरी सेवा निवृत्तीवेतन (दुसरी सुधारणा) २००५ रद्द करण्यासाठी चैत्यभूमी ते मंत्रालय अशा महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्यानंतर मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलनही करण्यात येणार आहे. यात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन शिक्षक सहकार संघटनेच्यावतीने केले आहे.
-------------
साप्ताहिक गाडीला
जादा स्लीपर बोगी
कणकवलीः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हापा-मडगाव-हापा साप्ताहिक गाडीला एक दिवसासाठी एक जादा बोगी जोडण्यात येत आहे. ही बोगी स्लीपर स्वरुपाची आहे. त्यानुसार १९ एप्रिलची हापा-मडगाव (२२९०८) व २१ एप्रिलची मडगाव-हापा (२२९०७) एका जादा बोगीनिशी धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
--------------
झाराप अपघातप्रकरणी
डंपर चालकावर गुन्हा
कुडाळः मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे महामार्ग ओलांडताना डंपरच्या धडकेने जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सुषमा गणपत नेमण (वय ५०, रा. मातोंड-पेंडूर, ता. वेंगुर्ले) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालक अमोल मधुसुदन पालव (रा. आकेरी-पालववाडी) याच्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. धडकेनंतर डंपर तेथेच ठेवून चालकाने पलायन केले होते. सौ. नेमण यांच्यावर काल (ता. १९)मातोंड-पेंडूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
-----------------
तेंडोलीत २९ ला
विविध कार्यक्रम
कुडाळः तेंडोली-भोमवाडी येथील अनलादेवी मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त अनलादेवी कला-क्रीडा मंडळातर्फे २९ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता अनलादेवी मंदिरात जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी ७०००, ५०००, २००० व १००० रुपये अशी पारितोषिके आहेत. सर्व विजेत्यांना चषक व सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या वीस स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सिद्धेश राऊळ, शशांक राऊळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अनलादेवी कला-क्रीडा मंडळाने केले आहे.
-----------------
भागवत सप्ताहाचे
देवबागला आयोजन
मालवणः श्री देव पंढरीनाथ ग्रामस्थ मंडळ, देवबाग यांच्यावतीने श्री देव पंढरीनाथ देवालय येथे २२ ते २८ एप्रिल या कालावधीत श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी भागवत संहिता पारायण व सायंकाळी प्रवचन (निरुपण) व त्या अनुषंगाने पूर्वांग, उत्तरांग, होमहवन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. भागवत सप्ताहात प्रसिद्ध प्रवचनकार रागवेंद्र बुवा देशपांडे (रामदासी) व प्रसिद्ध संहिता वाचनकार पांडुरंग करंबळेकर हे प्रवचन करणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन पंढरीनाथ ग्रामस्थ मंडळ देवबाग-मोबार यांनी केले आहे.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com