
कनेडी राड्या प्रकरणी आमदार नाईक, पारकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर
कनेडी राड्या प्रकरणी आमदार नाईक,
पारकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर
कणकवली, ता. २०ः येथे शिवसेना आणि भाजप यांच्यातील राड्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल असलेल्या शिवसेना आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी मंजूर केला आहे. या तीनही संशयीतांच्या वतीने अॅड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला.
कनेडी येथे २४ जानेवारी रोजी माघी गणेश जयंतीची तयारी सुरू असताना या अनुषंगाने या गुन्ह्यातील आरोपी कुणाल सावंत याला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मारहाण केली. या झटापटीत गोट्या सावंत यांचा मोबाईल चोरून नेला. त्यानुसार याप्रकरणी गोट्या सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यात आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांच्या सांगण्याने जमावाला उद्युप्त करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला व राडा घडविण्यासाठी या तिघांनी जमावाला उद्युप्त केले अशी फिर्याद श्री. सावंत यांनी दिली होती. या दरम्यान आमदार नाईक हातात दांडा घेऊन पोलीस व इतरांना धमकावण्याचा व भडकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी जमावाला उद्युप्त केल्याने गोट्या सावंत यांना मारहाण झाली. याप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांच्याकडे अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार या अर्जावर सुनावणी होत या तिघांचाही जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.