समुद्र जाणून घेण्यासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्र जाणून घेण्यासाठी
समुद्र जाणून घेण्यासाठी

समुद्र जाणून घेण्यासाठी

sakal_logo
By

७ एप्रिल टुडे चार

१४ (टूडे ४ साठी)

सागरमंथन ...........लोगो


-rat२०p१८.jpg ः -
९७२४१
डॉ. स्वप्नजा आ. मोहिते
--
समुद्र जाणून घेण्यासाठी!

जेव्हा आपण समुद्राचा, महासागराचा विचार करतो तेव्हा आपण त्याच्या लाटा, खारट हवा आणि हिरव्या निळ्या रंगाचा विचार करतो; पण यापेक्षाही समुद्राचं जग खूप वेगळे आहे. अद्भुत आणि आश्चर्यकारक ही! आपल्या ग्रहाचा सुमारे ३ चतुर्थांश भाग महासागरांनी व्यापलेला आहे; परंतु पाण्याच्या पृष्ठभागाखाली जे आहे त्यावर फारच कमी संशोधन झाले आहे किंवा त्याबद्दल आपल्याला अजूनही चांगली माहिती मिळवता आलेली नाही. याची अनेक कारणेही आहेत; पण या अत्यावश्यक आणि आपल्या जीवनाशी जवळचा संबंध असलेल्या परिसंस्थेबद्दल माहिती करून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या ग्रहाला ब्लू प्लॅनेट अशी ओळख मिळाली आहे त्या समुद्रांबद्दल माहिती हवीच, नाही का? हवामानाच्या संकटाने आपल्या ग्रहावरील महासागर आणि पाण्याच्या पृष्ठभागाखाली राहणाऱ्या सागरी जीवनाबद्दल आपल्या सर्वांना नवीन दृष्टी दिली आहे.
-----

प्राचीन आणि आधुनिक संस्कृतींनी ज्ञात जगाच्या समुद्रांची विभागणी केली आणि सात समुद्र आहेत असे सांगत त्यांना वेगवेगळी नावे दिली असली तरी तांत्रिकदृष्ट्या फक्त एकच जागतिक महासागर आहे. म्हणजेच आपल्या पृथ्वीवरचे सर्व समुद्र, महासागर खरंतर एकच आहेत. आर्क्टिक, अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी महासागर आणि दक्षिणेतील महासागर, सर्वच पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्रवाहांद्वारे पाण्याची देवाणघेवाण करतात. याचाच अर्थ एका प्रदेशातील बदल इतरांवर परिणाम करू शकतात. म्हणूनच आज आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज यांचा विचार समुद्राच्या पार्श्वभूमीवर करत आहोत.
महासागरांची सरासरी खोली १२ हजार १०० फूट आहे आणि प्रकाश पाण्यात केवळ ३३० फूट खोलीपर्यंत पोहोचू शकतो. त्या खाली गडद अंधाराचा प्रदेश सुरू होतो. आपल्या ग्रहाचा बहुतांश भाग पाण्याने व्यापला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, पृथ्वीचा बराचसा भाग सतत अंधारातच असतो, असेच म्हणायला हवे. म्हणजेच समुद्रातील जे सजीव आहेत त्यांची मोठी संख्या या प्रकाशमान भागात आढळते, असा आपला समज होता; पण आता गडद अंधारमय भागातही अनेक जलचर राहत आहेत, हे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, ग्रहाचे ८० टक्के जीवन समुद्राच्या पृष्ठभागाखाली आहे; पण आपल्याला त्या अथांग आणि अफाट अशा जैवविविधतेचा फक्त एक छोटासा भागच माहित आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा बराचसा भाग पाण्याखाली असल्यामुळे समुद्रामध्ये आढळणाऱ्या प्रजाती, जमिनीवर असलेल्या सजीवांपेक्षा जास्त आहेत, हे आश्चर्यकारक नाही. पृथ्वीवरील एकूण सजीव प्रजातींपैकी ९४ टक्के सजीव महासागरांमध्ये अस्तित्वात आहेत. सागरी प्रजातींच्या जागतिक नोंदणीनुसार, सुमारे २ लाख ५० हजार स्वीकृत सागरी प्रजाती आहेत; परंतु आपल्याला ज्या प्रजातींची माहिती झाली आहे ती संख्या अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेच्या १० टक्केसुद्धा नाही. यामुळेच जगभर सुरू असलेल्या सागरी संशोधनातून दररोज नवीन सागरी जीव शोधले जात आहेत. या सजीव सृष्टीतील जगातील सर्वात मोठी सजीव रचना ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील ग्रेट बॅरियर रिफ आहे. ही प्रवाळांची रचना एवढी मोठी आहे की, ती अवकाशातूनही प्रत्यक्षात दिसू शकते. ही रिफ रचना कोट्यवधी लहान जीवांनी बनलेली आणि तयार केलेली आहे, ज्यांना कोरल पॉलिप्स म्हणतात. लाखो करोडो कोरल पॉलिप्सनी स्रवलेल्या कॅल्शिअम कार्बोनेटच्या संरचनेतून ही कोरल रिफ बनली आहे. यामुळे ही रिफ जगातील सर्वात जटिल नैसर्गिक परिसंस्थांपैकी एक मानली जाते.
जास्त सूर्यप्रकाश उथळ पाण्यात प्रवाळांच्या आत राहणाऱ्या एकपेशीय वनस्पतीचे नुकसान करू शकतो. प्रवाळातील एकपेशीय शैवाल हे त्यांचे मदतनीस असतात. या सूक्ष्म वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी कोरल फ्लोरोसेस करतात. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, जेव्हा सिम्बायोटिक सूक्ष्म-शैवाल नष्ट होतात तेव्हा ब्लीच झालेल्या कोरलमधील विशिष्ट प्रथिने चमकणारे रंग तयार करतात, जे संरक्षणात्मक सनस्क्रीनसारखे कार्य करतात. ग्रेट बॅरियर रीफवर, शास्त्रज्ञांनी कोरलमध्ये नैसर्गिक सनस्क्रीनचे स्रोत शोधून काढले आहेत. ही प्रथिने कोरल खाणाऱ्या माशांचेदेखील संरक्षण करू शकतात. ही UVA/UVB किरणांपासून संरक्षण करणारी यंत्रणा आहे. म्हणूनच आज या प्रथिनांचा अभ्यास करून नैसर्गिक सनस्क्रीन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मानवांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन तयार होईलही; पण ते मिळवण्याच्या प्रयत्नात प्रवाळ खडकांचा मोठा स्रोत नष्ट होईल, याचे आपण भान ठेवले पाहिजे. आज कोरल्स म्हणजेच प्रवाळांवर समुद्राच्या आम्लीकरणाचा परिणाम होऊन ते मृत होत चालले आहेत. समुद्रातील अन्नसाखळीचा महत्वाचा दुवा असणाऱ्या या परिसंस्था नष्ट झाल्या तर संपूर्ण जलचर सृष्टीवर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो.

सर्वात उष्ण पाणी समुद्राच्या तळाशी आहे, हे तुम्हाला माहित आहे का? समुद्र जिथे सगळ्यात थंड असतो त्या खोल प्रदेशात, हायड्रोथर्मल व्हेंट्स ७५०० फॅरेनहाइट (४००० सेल्सिअस) पर्यंत गरम असे पाणी सोडत असतात. एवढे तापमान असूनही मग हे समुद्र उकळताना का दिसत नाहीत? त्याचं ही कारण आहे. या खोलीवरचा जो तीव्र दाब आहे (तोच दबाव जो तुम्हाला चिरडून टाकू शकतो), तोच हे पाणी उकळण्यापासून रोखतो. हे खोल समुद्रातील गरम झरे रासायनिकदृष्ट्या वेगळ्या परिसंस्थांनी वेढलेले आहेत जेथे प्रचंड प्रमाणात सूक्ष्मजीव समुदाय विकसित झाले आहेत. उच्च तापमान, पाण्याचा प्रचंड दाब आणि पूर्ण अंधार असूनही या हे सजीव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत असतात.
पाण्याच्या पृष्ठभागाखाली प्रकाश पोहोचणे कमी होत जाते आणि ६५० फुटांवर तर अगदी गडद असा काळोखच असतो. तुम्ही समुद्रात जितके खोलवर जाल तितकी तेथील परिस्थिती आणखीनच कठोर होत जाईल. या खोल समुद्रातील प्राणी आणि ते जिथे राहतात त्या अधिवासाबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खोल समुद्रातील प्राण्यांमध्ये बहुतेक वेळा वाढ अतिशय मंदपणे होते. बऱ्याच प्राण्यांच्या मंद वाढीमुळे त्यांचे जीवनचक्र बरेचदा मोठे असते. खोल पाण्यातील अनेक माशांच्या प्रजाती ३० वर्षे किंवा त्याहून अधिक वयापर्यंत जगू शकतात.

अथांग खोल महासागर म्हणजे अतिशय काळोख असलेली शांत क्षेत्रे असतील, असे तुम्हाला वाटत असेल ना? पण तसे अजिबातच नाहीये, बरं का! या अंधारमय जगात सतत कसले ना कसले तरी आवाज ऐकू येत असतात. पाण्याचे कण हवेपेक्षा जास्त घनतेने भरलेले असल्यामुळे, ध्वनी वेगाने आणि दूरवर जातो. खोल समुद्रातील गडबडीमध्ये दूरवरच्या भूकंपांचा आवाज, व्हेलच्या विव्हळण्याचा किंवा एकमेकांना साद घालण्याचा आवाज, स्नॅपिंग कोळंबीच्या नांग्यांचा आवाज आणि लाटाचे मंथन करणाऱ्या टायफून्सचा आवाज यांचा समावेश आहे. त्यातच अलिकडच्या काळात मानवनिर्मित आवाजांची भर पडत आहे. समुद्रातील परिसंस्था अतिशय संवेदनक्षम आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज यांच्याबरोबरच आपल्याही हस्तक्षेपामुळे त्यातील जलचर कमी होत जाणे, नामशेष होणे अशा स्थितीत पोहोचू शकतात. आज आपण नुसते मासळी बाजारात किंवा बंदरांवर गेलो तरी मासळी कमी झाल्याची किंवा काही मासळीच्या प्रजाती अजिबातच मिळत नसल्याचे आपल्या लक्षात येते. मग बाकीच्या जलचरांचे काय?

(लेखिका मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे मत्स्य जीवशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. )
-------------------