
- विकासरत्नतून शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवणार
rat२०२५.txt
बातमी क्र.. २५ (पान २ साठी)
‘विकासरत्न’तून योजना जनतेपर्यंत पोचवणार
जिल्हा परिषद ः उपक्रमाची सुरवात एप्रिल अखेरपासून
रत्नागिरी, ता. २० ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे महत्वाचे घटक आहेत. यामध्ये शासन आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्याशी दुवा म्हणून जिल्हा परिषद भूमिका बजावते. शासनाच्या महत्वाच्या योजना ग्रामपंचायतीमार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा परिषद करते. हे कामकाज कसे चालते, हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी आता विकासरत्न हे त्रैमासिक सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हा परिषद म्हणजे ग्रामीण विकास केंद्र आहे. त्यांच्यामार्फतच शासनाच्या विविध योजना थेट ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवले जातात. हा मिनी मंत्रालयाचा कारभार कसा चालतो, किती विभाग असतात, अधिकारी कोण कोण असतात याची सर्व माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी विकासरत्न हे त्रैमासिक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या त्रैमासिकमध्ये जि. प. च्या सर्व विभागामार्फत तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमार्फत राबवण्यात येणारे उपक्रम, केंद्र व राज्य त्याचबरोबर जि. प. च्या विविध योजना याबाबतची माहिती, विविध उपक्रमांचे छायाचित्र, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे तसेच चांगले काम करणारे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांच्या यशोगाथा असणार आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण जनतेला जिल्हा परिषदेच्या कामकाजाविषयी अभ्यासपूर्ण माहिती मिळणार आहे. या उपक्रमाची सुरवात एप्रिल महिन्यापासून करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. हे त्रैमासिक तयार करण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी पी. डी. यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, प्रभारी उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे यांचा समावेश आहे. संपादकीय समितीचे प्रमुख म्हणून सुधाकर मुरकुटे यांची निवड करण्यात आली आहे.