अध्यक्षपदी डांटस, उपाध्यक्षपदी नानचे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्षपदी डांटस, उपाध्यक्षपदी नानचे बिनविरोध
अध्यक्षपदी डांटस, उपाध्यक्षपदी नानचे बिनविरोध

अध्यक्षपदी डांटस, उपाध्यक्षपदी नानचे बिनविरोध

sakal_logo
By

swt२१११.jpg
९७५९०
ओरोसः जिल्हा खरेदी विक्री संघ अध्यक्षपदी व्हिक्टर डांटस व उपाध्यक्षपदी संतोष नानचे यांची निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व सर्व संचालक.

अध्यक्षपदी डांटस, उपाध्यक्षपदी नानचे बिनविरोध
जिल्हा खरेदी विक्री संघः जिल्हा बँक अध्यक्ष दळवींकडून निवड
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ तथा जिल्हा खरेदी विक्री संघ या संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संचालक व्हिक्टर डांटस यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष नानचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेवर भाजपचे वर्चस्व असताना भाजपने अनुभवी व वरिष्ठ संचालक असलेल्या डांटस यांना अध्यक्षपदाचा मान दिला आहे. यामुळे राजकीय पटलावर उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ या संस्थेची २०२३ ते २०२८ या पाच वर्षाकरिता जाहीर केलेली निवडणूक बिनविरोध झाली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षानी एकत्रित संस्था हित डोळ्यासमोर ठेवत ही निवडणूक बिनविरोध केली होती. त्यानंतर आज ओरोस येथील संस्थेच्या प्रधान कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी खास सभा निमंत्रित केली होती. जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी श्रीकृष्ण मयेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी संचालक जिल्हा बँक अध्यक्ष तथा संस्था संचालक मनीष दळवी, व्हिक्टर डांटस, संतोष नानचे, प्रकाश मोर्ये, विठ्ठल देसाई, प्रसाद रेगे, प्रमोद गावडे, दिगंबर पाटील, कृष्णा चव्हाण, आनंद ठाकूर, रामानंद शिरोडकर, मोहन देसाई, राजेंद्र शेट्ये, श्रीकृष्ण तळवडेकर, आत्माराम राऊळ, वैशाली प्रभू, चित्रा कनयाळकर आदी उपस्थित होते.
संस्था कार्यालयात सर्व संचालक उपस्थित झाल्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी अध्यक्षपदासाठी डांटस यांची तर उपाध्यक्षपदासाठी नानचे यांची उमेदवार म्हणून सर्व संचालकांच्यावतीने निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार डांटस यांनी अध्यक्षपदासाठी तर नानचे यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध होत असल्याचे जाहीर केले. निवडीनंतर दळवी यांच्यासह अतुल काळसेकर व अन्य सहकारातील लोकप्रतिनिधी उपस्थिती लावत नवनियुक्त दोन्ही पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे यांच्यासह वराड, कट्टा येथील व्हिक्टर डांटस यांचे समर्थक उपस्थित होते.