
पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळू नयेत
२१ ( पान ३ साठी)
-rat२१p२०.jpg ः
९७६०७
गुहागर ः सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या याच फोटोने कासव महोत्सवाला गालबोट लागल्याचे स्पष्ट झाले.
--
कासवांची अंडी, पिल्ले हाताळणे संवर्धनाला बाधक
वनविभागाचे आवाहन ; गुहागरात अतिउत्साहाचे प्रदर्शन
गुहागर, ता. २१ ः कासव संवर्धन उपक्रम संवेदनशील विषय असून, पर्यटकांनी कासवांच्या जीवनाचा आनंद लुटावा; मात्र कासवांची अंडी, पिल्ले हाताळू नयेत. हे प्रकार कासव संवर्धन मोहिमेला हानी पोचवणारे आहेत, असे आवाहन वनखात्याच्या अधिकारी राजश्री कीर यांनी केले आहे.
गुहागर, आंजर्ले, वेळास या ठिकाणी सध्या कासव महोत्सव सुरू आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. यातील काही अतिउत्साही मंडळी कासवांची अंडी आणि पिल्ले हातात घेण्याची मागणी करतात, आग्रह धरतात. गुहागरमध्ये काही पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळली, त्याची छायाचित्रे काढली. सामाजिक माध्यमांवर कौतुकाने प्रसारित केली; मात्र माध्यमांवर ही छायाचित्रे आल्यानंतर या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कासवप्रेमी, कासव अभ्यासक या सर्वांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर कासव संवर्धन मोहीम राबवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची गंभीर दखल घेतली. परिणामी, एका कासवमित्रावर निलंबनाची कारवाई झाली.
याबाबत कीर म्हणाल्या, गुहागरमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचे आयोजन आम्ही केले. आंजर्ला, वेळास येथे पूर्वीपासून कासव महोत्सव असल्याने तेथे स्वयंसेवकांची प्रशिक्षित टीम आहे. आयोजकांना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आहे. गुहागरमध्ये पहिलाच प्रयत्न यशस्वी करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो. कासव महोत्सवाच्या कालावधीत दररोज सुमारे ५० ते १०० पर्यटक समुद्रावर कासवाची पिल्ले पाण्यात झेपावताना पाहण्यासाठी उपस्थित होते; मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गडबड झाली. येथील कासवमित्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पर्यटकांच्या वर्तनामुळे कासव महोत्सवाला गालबोट लागले. हा संपूर्ण प्रकार अज्ञातातून, अनवधानाने घडला असला तरी गंभीर आहे. यामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पर्यटकांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांनी कासवमित्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटावा; मात्र कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लांना हात लावू नये, अंडी हाताळू नये, संवर्धनासाठी उभारलेल्या केंद्रात प्रवेश करू नये.