आडाळीत आर्यन ग्रुप मोठा उद्योग आणणार

आडाळीत आर्यन ग्रुप मोठा उद्योग आणणार

swt२११८.jpg
९७६३६
आडाळीः कार्यकर्ते व शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मंत्री दीपक केसरकर. (छायाचित्रः संदेश देसाई)

आर्यन ग्रुप मोठा उद्योग आणणार
आडाळीत १५० एकरची मागणी; मंत्री केसरकरांकडून जागेची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २१ः आडाळी एमआयडीसीच्या जागेत उद्योग उभारण्यासाठी आर्यन ग्रुप पुढे सरसावला असून त्यासाठी १५० एकर जागेची त्यांची मागणी आहे. त्या जागेच्या पाहणीसाठी आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा दौरा होता. या दौऱ्यात आर्यन ग्रुपचे संचालक उपस्थित होते. तिलारी क्षेत्रात पर्यटन विकसित करण्यास राज्य शासनाने अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे तिलारी पर्यटनाला चालना मिळणार असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
शासकीय दौऱ्यात शिक्षणमंत्री केसरकर यांचा आज दोडामार्ग दौरा झाला. आडाळी एमआयडीसीच्या जागेत उद्योग आणण्याच्या अनुषंगाने मंत्री केसरकर यांनी आर्यन ग्रुपच्या एका संचालकांना दौऱ्या दरम्यान तिलारी येथे आणले होते. यावेळी तहसिलदार अरुण खानोलकर, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, बांधकाम उपअभियंता बडे, मंडळ अधिकारी राजन गवस, प्रेमानंद सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशाप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, रामदास मेस्त्री, बाबाजी देसाई, परेश पोकळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. केसरकर व आर्यन ग्रुपचे संचालक हेलिकॉप्टरने तिलारी येथे महालक्ष्मी विद्युत केंद्राच्या हेलिपॅडवर उतरले. मात्र, त्याच ठिकाणी मंत्री केसरकर यांनी शिवसेना पदाधिकारी, शासकीय अधिकारी व पत्रकार यांच्याशी संवाद साधून तेथूनच पुनश्च माघारी फिरले.
यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योग उभारणीसाठी आर्यन ग्रुपने पुढाकार घेतला आहे आणि त्याबाबत त्यांच्याशी आपली चर्चा देखील झाली आहे. आर्यन ग्रुपच्या संचालकांना मी प्रत्यक्ष येथे आणले आहे. ते आडाळी एमआयडीसीच्या जागेत उद्योग उभारण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी एमआयडीसी मध्ये १५० एकर जागेची त्यांची मागणी आहे. एमआयडीसी जागेत पाणी सुध्दा उपलब्ध आहे. यांच्या माध्यमातून जर पहिला प्रकल्प येत असेल तर तो यावा. उद्योग आणण्यासाठी जे माझे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना यश मिळेल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘तिलारी क्षेत्र हे निसर्गरम्य असल्याने येथे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी राज्य शासनाने अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्या प्रकारे पर्यटन विकसित करता येईल याची पाहणी करण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. आडाळी एमआयडीसी जागेची व तिलारी धरण परिसराची हेलिकॉप्टरद्वारे हवाई पाहणी केली आहे. एवढ्या व्यस्त वेळातून सुध्दा मी येथे येऊन जातो, कारण येथील रोजगाराच्या समस्या सुटल्या पाहिजेत. ही माझी भूमिका आहे. त्यासाठीच माझा आजचा दौरा आहे. कोणावरही टीका करण्यासाठी माझा दौरा नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. जे एवढे मोठे पद मिळाले आहे, ते लोकांमुळेच. जो मला वेळ मिळेल तो वेळ मी सिंधुदुर्गच्या विकासासाठी खर्ची लावणार आहे.’’

चौकट
घोटाळ्याची चौकशी लावू
आडाळी येथील एमआयडीसीमधील काही जमीन एमआयडीसी संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर विकून शंभर कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा जो आरोप होत आहे, त्या संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार आहे. खरोखरच जर जमीन विकण्याचा घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

चौकट
विकास कामांकडे माझे लक्ष
दोडामार्ग तालुक्यातील अनेक रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, दोडामार्ग शहरात पंचायत समितीची नूतन इमारत, मोठमोठे पूल तसेच अनेक विकास कामे पूर्ण करण्याकडे आपले लक्ष आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी विकास कामे करून जनतेला दिलेला शब्द मी पाळला आहे. विकास कामे म्हणजे काय हे ज्यांना माहीत नाही, त्यांच्यावर मला टीका करायची नाही. त्यांना सांगितले पाहिजे की थोडा संयम धरा. उठसूट टीका करत राहू नका. आतापर्यंत झालेली कामे कोणी केली हे सर्वांना माहीत आहेत, अशी टिकाही मंत्री केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे राजन तेली यांच्यावर केली.

चौकट
हत्ती प्रश्न निकाली लावणार
हत्ती प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढायचा आहे. त्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दोन दिवसात बैठक घेऊन अत्यंत आवश्यक अशी उपाययोजना केली जाईल. धरणाच्या पलीकच्या भागात हत्तींना घालवून ते परत येणार नाहीत, याची व्यवस्था केली जाईल. हत्तीच्या त्रासातून शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सुटका केली जाईल. नुकसान भरपाई वाढवून मिळण्यावर बैठकीत विषय मांडणार असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com