पान एक-443 शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा

पान एक-443 शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा

पान एक

४४३ शिक्षकांच्या
बदलीचा मार्ग मोकळा
---
जिल्ह्याबाहेर जाणार; २ मेनंतर कार्यमुक्त
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः आंतरजिल्हा बदली होऊन कार्यमुक्त होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ४४३ प्राथमिक शिक्षकांच्या कार्यमुक्ती आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज स्वाक्षरी केली आहे. कार्यमुक्त आदेशावर स्वाक्षरी झाली असली, तरी प्रत्यक्षात २ मेनंतर या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी सांगितले. दरम्यान, ४४३ शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात बदलीने गेल्यावर जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांची संख्या एक हजार ८६ होणार आहे.
दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिक असलेले असंख्य शिक्षक जिल्ह्यात कार्यरत आहेत. हे शिक्षक आपल्या जिल्ह्यात जाण्यास इच्छुक असल्याने यासाठी राज्य शासनाने विविध टप्पे राबवत ऑनलाईन अर्ज भरून घेतले होते. त्यातील ४५९ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली होती. परंतु, शासनाने मंजूर शिक्षकांच्या १० टक्के पदे रिक्त असल्यास त्या शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे शिक्षकांनी कार्यमुक्त करण्यासाठी शासनाकडे तगादा लावला होता. शिक्षक संघटनाही यासाठी आग्रही होत्या.
अलीकडे शासनाने याबाबत सुधारित आदेश काढले होते. यात आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना १६ ते ३० एप्रिल या कालावधीत कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रक्रिया राबवत कार्यमुक्त करण्याचे प्रस्ताव तयार करीत मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्याकडे स्वाक्षरीसाठी ठेवले होते. आज ४४३ प्रस्तावांवर नायर यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे हे शिक्षक आता आपल्या जिल्ह्यात जाणार असल्याचे निश्चित झाले. मात्र, या शिक्षकांना हे शैक्षणिक वर्ष संपल्यावर २ मेनंतर सोडण्याचे आदेश नायर यांनी दिले आहेत.

रिक्त शिक्षक पदे
संख्या वाढणार
जिल्ह्यात सध्या मंजूर उपशिक्षक पदांपैकी ३०६ पदे रिक्त आहेत; तर मंजूर पदवीधर शिक्षक या पदांपैकी ३३७ पदवीधर शिक्षक पदे रिक्त आहेत. एकूण ६४३ शिक्षक पदे रिक्त आहेत. शासनाच्या जिल्ह्याबाहेरील बदली नियमानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांतील ४४३ शिक्षकांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली. हे शिक्षक २ मेनंतर येथून कार्यमुक्त होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांची संख्या एक हजार ८६ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com