राजापूर-नितांत सुंदर जुवे बेटाला रस्त्याची प्रतीक्षा

राजापूर-नितांत सुंदर जुवे बेटाला रस्त्याची प्रतीक्षा

rat24p11.jpg
98226
राजापूरः संभाव्य रस्त्याचा गुगलद्वारे घेण्यात आलेला नकाशा.
rat24p12.jpg
98227
राजापूरः गोड्या पाण्याची सार्वजनिक विहीर.
rat24p13.jpg
98228
राजापूरः जुवे बेटावर जाय-ये करण्यासाठी सज्ज असलेली होडी.

rat24p14.jpg
98228
राजापूरः पाण्याने वेढलेल्या जुवेचे विहंगम दृश्य.
-------------
जुवे बेटाला रस्त्याची प्रतीक्षा
पारंपारिक होडीनेच दळणवळण; बांधलेला रस्ता सध्या बंद
राजापूर, ता. २४ः गाव सीमेचे भौगोलिक संदर्भ बदलत चारी बाजूंनी निळाशार पाण्याने वेढलेले गाव म्हणजे राजापूर तालुक्यातील जुवे. पारंपरिक होडी वगळता दळणवळणाचे कोणतेही साधने नसलेल्या जुवे गावाने बेट म्हणून आपली स्वतंत्र ओळख जपली आहे. जलदेवतेने जणू कवेत घेतलेल्या या गावाकडे पर्यटकांचा ओढा वाढला नाही तर नवलचं म्हणावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभलेल्या या गावाला गेल्या कित्येक वर्षापासून जोडरस्त्याची प्रतिक्षा राहीलेली आहे. जुवे गावाला अन्य भौगोलिक प्रदेशांना थेट जोडणारा आणि गावच्या विकासाला विविध मार्गांनी खऱ्या अर्थाने चालना देणारा हक्काचा रस्ता मिळणार कधी ? असा प्रश्‍न गेल्या कित्येक वर्षापासून जुवेवासीयांना सतावत आहे.
ब्रिटीशकाळामध्ये राजापूरचे बंदर निर्यातीसाठी प्रसिद्ध होते. या बंदरामध्ये ज्या खाडीतून जहाजे येत होती त्या जैतापूरच्या खाडीमध्ये विलीन होणार्‍या अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट सुमारे ४४ हेक्टर परिसरात वसले आहे. या ठिकाणी सुमारे शंभरहून अधिक घर आहेत. एका बाजूला जैतापूर बंदर, तर, दुसर्‍या बाजूला देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, मारवेली गाव आदी गावांचा सहवास लाभलेल्या जुवे बेटाला समुद्राच्या निळाशार पाण्याने वेढा घातलेला आहे. या गावामध्ये जा-ये करण्याचा एकमेव आधार असलेल्या छोट्या होडीतून जैतापूर बंदर इथून सुमारे तीन किमीची समुद्रसफर करून गावात प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने गावपणाची साक्ष मिळते.
सुमारे दहा-बारा वर्षापूर्वी जुवे बेटाला जोडणारा सुमारे नऊशे मीटर लांबीचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे देवाचे गोठणे मुख्य रस्ता ते गिरे चिंचेमार्गे खारलॅण्ड बंधारा जुवे बेट असा काही किमीचा रस्त्याने प्रवास जुवेवासीयांचा प्रवास सुरू झाला होता. मात्र, सद्यस्थितीमध्ये हा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जुवेवासियांना पुन्हा एकदा जा-ये करण्यासाठी होडीशिवाय पर्याय नाही. बंद असलेला हा रस्ता कायमस्वरूपी सुरू व्हावा अशी मागणी शासन, प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र अद्यापही रस्त्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. या रस्त्याच्या उभारणीमध्ये डोंगराएवढ्या तांत्रिक अडचणी असल्या तरी त्यांची सोडवणूक होवून रहदारीच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा देवाचे गोठणे मुख्य रस्ता ते गिरे चिंचेमार्गे खारलॅण्ड बंधारा जुवे बेट हा सुमारे साडेचारशे मीटर लांबीचा रस्ता कायमस्वरूपी व्हावा, अशी मागणी जुवेवासियांकडून केली जात आहे.

चौकट
ताराराणी काही दिवस राहिल्या होत्या जुवे बेटावर
औरंगजेबाकडून संभाजी महाराज यांना कोकणात संगमेश्‍वर येथे अटक होण्यापूर्वी पुढील परिणामांची संपूर्ण चाहुल लागलेल्या महाराजांनी सोबत असणाऱ्या ताराराणींना कोल्हापूरला सुखरूप पाठविण्यापूर्वी राजापूर किंवा सिंधुदुर्गात काही काळ ठेवण्याच्या सूचना मावळ्यांना केल्या होत्या. त्यावेळी ताराराणींना आरमाराने राजापूर खाडीमार्गे कोल्हापूरला नेण्यात येणार होते. ही जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी आरमारी प्रमुख मालोजी शिंदे-(खोत) आणि दर्यावर्दी लढवय्ये सहकारी यांच्यावर सोपविली होती. राजापूरच्या खाडीच्या मुखावर व अरबी समुद्रालगत असलेल्या यशवंत गडावर असलेल्या पोर्तुगीजांमुळे ताराराणींना बाहेर नेणे शक्य नव्हते. त्यामुळे काही दिवस ताराराणींना सुरक्षित ठेवण्यासाठी नदी मुखावरील या जुवे बेटावर ठेवण्यात आले. काही दिवसांनी पुन्हा राजापूर-गगनबावडामार्गे ताराराणींना सुखरूप कोल्हापूरला पाठविण्यात आले. ही जबाबदारी पार पाडणाऱ्या मालोजी शिंदे (खोत) आणि दर्यावर्दी सहकारी यांना हे बेट इनाम देण्यात आले. त्याकाळी कुणाचीही वस्ती नसलेल्या जुवे गावचे मालोजी शिंदे(खोत) आणि दर्यावर्दी सहकारी पहिले रहिवाशी मानले जातात.
----------
चौकट
छोटी होडी हेच संपर्काचे एकमेव साधन
देवाचेगोठणे येथून खाडीतून वीजखांब टाकून १९८४ मध्ये गावात वीज आली. जुवेचा जमिनीशी संपर्क व्हावा यादृष्टीने माजी बांधकाम राज्यमंत्री ल. र. हातणकर यांच्या प्रयत्नाने खारलॅण्ड बंधाऱ्याला सुमारे १९८२ मध्ये खऱ्या अर्थाने चालना मिळाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार गणपत कदम यांनी त्याला मूर्त स्वरूप मिळवून दिल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. मात्र सुमारे नऊशे मीटर लांबीच्या या बंधाऱ्याची दरवर्षी होणारी झीज आणि दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष आदींमुळे बंधारा ढासळला आहे. त्यामुळे जुवेवासियांचे छोटी होडी हेच संपर्काचे एकमेव साधन.
---------------
चौकट
प्रस्तावित कांदळवन उद्यान निर्मिती
जुवे येथे कांदळवन उद्यान निर्मिती करण्याचा हालचाली गेल्या काही वर्षापासून वनविभागातर्फे सुरू आहेत. त्यामध्ये पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता निसर्ग पर्यटनाचा विकास, स्थानिक लोकांच्या संस्कृतीचे जतन व रोजगाराला चालना देणे, कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम करण्यात येणार आहे. प्रस्तावित असलेला हा प्रकल्प सुमारे १०.६० हेक्टर क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार आहे. कांदळवन उद्यानाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार निर्मिती अंतर्गत खेकडा पालन, कोळंबी पालन, विविध रंगीत माशांचे उत्पादन करणे या बाबींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले जाते. या उद्यानामध्ये निसर्ग माहिती केंद्र, कांदळवन म्युझियम, तरंगते रस्त, जेटी, निरीक्षण मनोरे आदी कामे प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी सुमारे दहा कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. सध्या हा प्रस्ताव निधीच्या मंजूरीसह विविध मंजूरीसाठी शासनाकडे पाठविल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. या कांदळवन उद्यान निर्मितीच्या माध्यमातून जलदेवतेने जणू कवेत घेतलेले जुवे बेट पर्यटनदृष्ट्या भविष्यामध्ये जगाच्या नकाशावर येणे दृष्टीक्षेपात दिसत आहे.
-----------
चौकट
अत्यावश्यक सोयीसुविधांसाठी परावलंबी
चारही बाजूंनी वेढलेल्या जुवेमध्ये कोणत्याही वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना वैद्यकीय सुविधेसाठी होडीतून समुद्र किनारा गाठून जैतापूर वा सोलगाव गाठावे लागते. मात्र, त्यामध्ये जादा वेळ जात असल्याने अनेकवेळा गावामध्ये नसलेल्या वैद्यकीय सोयीसुविधा आणि त्या मिळविण्यासाठी करावा लागणारा प्रवास अनेकवेळा धोकादायक ठरतो. केवळ वैद्यकीय सोयीसुविधाच नाही तर, पोष्ट ऑफीस, बॅक, रेशनिंग आदी कामांसाठी त्यांना होडीतून जैतापूर गाठावे लागते. दैनंदीन जीवनावश्यक वस्तू वा बाजाररहाट करण्यासाठी जैतापूर बाजारपेठ गाठावी लागते.
------------------
कोट
संपर्क अन् रहदारीच्यादृष्टीने कायमस्वरूपी वाहतुकीसाठी जोडरस्ता व्हावा, अशी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ग्रामस्थ शासनाकडे मागणी करीत आहोत. त्याबाबतची प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदनेही दिली आहेत. मात्र, त्याची अद्यापही शासन-प्रशासनाकडून दखल घेतली गेलेली नाही. रस्त्याअभावी आम्ही वर्षानुवर्षे होडीतूनच प्रवास करायचा का ? रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावून शासन आम्हाला न्याय कधी देणार ?
- अनिल करंजे, जुवे ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com