सरकारवर गुन्हा दाखल करा

सरकारवर गुन्हा दाखल करा

98260
कुडाळ ः येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांचे स्वागत करताना इर्शाद शेख, विकास सावंत, साईनाथ चव्हाण, साक्षी वंजारी, प्रकाश जैतापकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

सरकारवर गुन्हा दाखल करा

श्रीरंग बरगे; हलगर्जीपणामुळे खारगरमध्ये उष्माघाताचे बळी

कुडाळ, ता. २४ ः देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार बंद हॉलमध्ये दिला जातो, महाराष्ट्र भूषण पुरस्कारही यापूर्वी राजभवनात दिला आहे. असे असताना ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी तळपत्या उन्हात सोहळा आयोजित करण्यात आला. तो कार्यक्रम म्हणजे उपस्थित लाखो अनुयायांचा राजकीय फायदा मिळावा, यासाठी सरकारचा आटापिटा होता, असा आरोप करत योग्य नियोजन न करणाऱ्या निष्काळजी शिंदे-फडणवीस सरकारवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील एमआयडीसीमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बरगे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सरकारच्या आकडेवारीनुसार, या कार्यक्रमानंतर उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला. ५०० पेक्षा जास्त लोक उपचार घेत आहेत. सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली; परंतु याने प्रश्न संपत नाही. घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री अचानक मृत्यू पावल्यावर पाच लाखांत वारसदार आपला उदरनिर्वाह कसा चालवणार, असा प्रश्न आहे. सरकारला आमचे प्रश्न आहेत की, एवढा मोठा कार्यक्रम भर उन्हात दुपारी का घेतला? लाखो श्रीभक्त जमणार हे माहिती असताना त्यांच्यासाठी तंबूची व्यवस्था का केली नाही? १३ कोटी रुपये खर्चून एवढे ढिसाळ नियोजन कसे? एवढा पैसा नक्की कुठे गेला? एखाद्या कार्यक्रमात काही विपरीत घडले तर आयोजकावर गुन्हा दाखल केला जातो, मग आयोजक राज्य सरकारवर गुन्हा का दाखल केला जात नाही?’’
श्री. बरगे म्हणाले, ‘‘आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या वेळेनुसारच कार्यक्रम घेतला, असे सरकारमधील मंत्री सांगत असून एवढ्या मोठ्या व्यक्तींवर हा आरोप लावणे व स्वतःवरचा गुन्हा लपविणे, हा प्रकार निंदनीय आहे. त्यापेक्षा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्यात सरकार कमी पडले, हे सत्य सरकार का नाकारीत आहे? ही निव्वळ सरकारचीच जबाबदारी आहे. जबाबदारी झटकून आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर खापर फोडण्याचा प्रकारही घृणास्पद व निंदनीय आहे. खारघरमध्ये झालेली घटना गंभीर असून शिंदे -फडणवीस सरकार त्याकडे फारसे गांभीर्याने पाहायला अजूनही तयार नाही. या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवे.’’ यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हा अध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकास सावंत, अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीमती साक्षी वंजारी, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभय शिरसाट, सुंदरवल्ली पडीयाची, प्रकाश जैतापकर, ॲड. दिलीप नार्वेकर, श्रीकृष्ण तळवडेकर, देवानंद लुडबे, मेघनाथ धुरी, महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, चंद्रशेखर जोशी, केतनकुमार गावडे, अमिदी मेस्त्री, जस्मिन लक्स्मेश्वर, आनंद परुळेकर, सुभाष पाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
--
सत्य बाहेर आलेच पाहिजे
श्री बरगे म्हणाले, ‘‘राज्यपालांना काँग्रेस पक्षाने विनंती केली आहे की, खारघरमधील घटनेसंदर्भात सर्व सत्य बाहेर आले पाहिजे आणि त्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे; पण त्यांच्याकडूनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे मृत्यू झालेल्या मृतांच्या वारसांना किमान ५० लाख इतकी रक्कम मिळावी, अशी मागणी आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com