
सिंधुदुर्गनगरीत विद्यार्थ्यांना करिअरचे धडे
सिंधुदुर्गनगरीत विद्यार्थ्यांना करिअरचे धडे
‘सामाजिक न्याय पर्व’; पंचशिल ट्रस्ट, मठकर ट्रस्टचा उपक्रम
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः सामाजिक न्याय पर्वानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे रविवारी करिअर मार्गदर्शन शिबिर व अंधश्रद्धा निमूर्लन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग व पंचशिल ट्रस्ट ओरोस व के. रुणी फटू मठकर चॅरिटेबल ट्रस्ट, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यामानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंतीच्या अनुषंगाने आयोजित या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, निवृत्त अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायालय संजय खोटलेकर, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हस्ते उपक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनींना करिअर विषयी युनिक अॅकॅडमीचे अच्युत देसाई यांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करून अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ‘समाज भूषण’ प्राप्त संजय खोटलेकर, सामाजिक कार्यकर्त तथा जिल्हा सत्र न्यायालय निवृत्त अध्यक्ष नामदेव मठकर, सिंधुदुर्ग समाज कल्याण विभागातील अनिल बोरीकर, सुनील बागुल, संतोष परुळेकर, रवींद्र जाधव, कुणाल इंदलकर, आरती सावंत, संदेश कसालकर, नैतिक वाघाटे, काशिराम कदम, नंदकिशोर सावंत, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.