तहानलेल्या पश-पक्ष्यांसाठी 
सावंतवाडीत पाण्याची भांडी

तहानलेल्या पश-पक्ष्यांसाठी सावंतवाडीत पाण्याची भांडी

९८४८४
सावंतवाडी ः मिशन जीवन उपक्रमाचा प्रारंभ करताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. दुर्भाटकर.

तहानलेल्या पश-पक्ष्यांसाठी
सावंतवाडीत पाण्याची भांडी
सावंतवाडी ः कडक उन्हाळ्यात पक्षी व प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी ‘मिशन आधार’तर्फे आज येथे ‘मिशन जीवन’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ शिवउद्यान येथून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दुर्भाटकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत मळगाव घाटी, शिल्पग्राम रोड, सावंतवाडी मच्छीमार्केट परिसर आणि पाटबंधारे विभाग, चराठा कॉलनी आदी ठिकाणी पाण्याची भांडी ठेवण्यात आली. यावेळी जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष परिमल नाईक, निवृत्त शिक्षक नाडकर्णी, सावंतवाडी पालिका कर्मचारी गजानन परब, पाटबंधारे खात्याचे संदीप राणे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ‘मिशन आधार’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ‘मिशन आधार’चे उपाध्यक्ष आनंद पुनाळेकर, प्रसाद नाडकर्णी, वैभव घाग, विश्राम केळूसकर, ऋषिकेश खानोलकर, वामन सावंत, तुषार रेमुळकर, ओमकार शिरोडकर, सोनाप्पा गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
...............
98482
सावंतवाडी : रस्ताकामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ करताना प्रमुख मानकरी राजेंद्र गावकर. बाजूला मान्यवर.

सोनुर्लीत रस्तेकामाला प्रारंभ
सावंतवाडी ः सोनुर्ली (ता.सावंतवाडी) ग्रामस्थांच्या मागणीनुसार माऊली मंदिर रस्ता डांबरीकरण नूतनीकरणासाठी ४५ लाखाचा निधी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला. या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रारंभ गावचे प्रमुख मानकरी राजेंद्र उर्फ राजू गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, सरपंच नारायण हिराप, गजानन नाटेकर, शंकर गावकर, संजय गावकर, बाळकृष्ण गावकर, गुरुनाथ म्हापसेकर, मारुती म्हापसेकर आदी उपस्थित होते. सोनुर्ली माऊली मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांचे आभार व्यक्त केले.
---
98438
देवगड ः मृगाक्षी हिर्लेकर हिला गौरविताना मुख्याध्यापिका आदिती राणे व अन्य.

मृगाक्षी हिर्लेकरचे ‘प्रज्ञाशोध’मध्ये यश
नांदगाव ः चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत हिंदळे-भंडारवाडी (ता. देवगड) शाळेची सातवीतील विद्यार्थिनी मृगाक्षी हिर्लेकर हिने देवगड तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिला २१० गुण प्राप्त झाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक अभ्यासाची सवय लागावी तसेच शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची आवड लागावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते. मृगाक्षी हिचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, देवगड शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका आदिती राणे तसेच पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. मृगाक्षी हिच्या यशाबद्दल कौतुक होत आहे.
..............
98440
पावशी ः मिटक्याचीवाडी येथे आयोजित बैलगाडी स्पर्धेस प्रतिसाद लाभला.

बैलगाडी शर्यतीस पावशीत प्रतिसाद
कुडाळ ः पावशी-मिटक्याचीवाडी येथे आयोजित बैलगाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अभिषेक वाटवे यांच्यावतीने शासनाच्या शर्ती आणि नियमांचे पालन करून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या विविध भागातून आठ बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले. स्पर्धा पाहण्यासाठी राज्यातील हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली. विजेत्या पहिल्या दहा स्पर्धकांना गौरविण्यात आले. यात अनुक्रमे चंद्रकांत वाटवे, मीरा देसाई, सागर गुरव, अनुराग वाटवे, शशांक सावंत, विनायक जंगम, साहिल अंबवकर, स्वराज गुरव, ओमकार राऊत यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शांतादुर्गा मंगल कार्यालयाचे कर्मचारी वर्ग, श्रीपाद तवटे आदींसह ग्रामस्थांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
..................
हापूसची आवक कमीच
तुर्भे : लहरी हवामानाचा कोकणातील अस्सल हापूसला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ऐन हंगामात हापूसची आवक कमी होत आहे, तर इतर ठिकाणच्या आंब्यांची आवक वाढली आहे. यंदा आतापर्यंत कोकणातून हापूसच्या केवळ वीस हजार पेट्यांची आवक झाली आहे. हापूसच्या नावे इतर रायवळ, कर्नाटकी आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. आपल्या अप्रतिम चवीमुळे कोकणातील हापूस विशेष लोकप्रिय असून त्‍याला इतर आंब्‍यांच्या तुलनेत दरही चांगला मिळतो. मात्र या वर्षी अस्सल हापूस बाजारात कमी आहे. त्यामुळे विक्रेत्‍यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्‍यता आहे. यावर उपाय म्‍हणून अनेकांकडून रायवळ, कर्नाटक आंबा हापूसच्या नावे विकला जात आहे. असे प्रकार होऊ नयेत म्हणून बाजार समितीने व्यापाऱ्यांना सुरुवातीलाच सक्त ताकीद दिली आहे, मात्र तरीही कर्नाटकी आंब्यात आणि कोकणातील हापूस आंब्यात फरक करता येत नसल्याने, ग्राहकांची फसवणूक सहजपणे होते. दोन-तीन डझनाचे कर्नाटकी आंब्‍याचे बॉक्‍स हापूस या नावाने पॅक करून सर्रास विक्री सुरू आहे. हवामान बदलाचा कोकणातील हापूसला मोठा फटका बसला. आधी मोहोर करपला, त्‍यानंतर पुन्हा झालेल्‍या अवकाळीने फळगळती झाली. त्‍यामुळे हापूसचे उत्‍पादनावर परिणाम झाला आहे.
-----
हुमरमळा येथे वर्धापन सोहळा
कुडाळ ः श्री देवी आई भवानी मंदिर पारकरवाडी-हुमरमळा (वालावल) येथे प्रथम वर्धापन दिन सोहळा उद्यापासून सुरू होत असून यानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या सकाळी ७.३० वाजता देवता वंदन, संकल्प, पुण्याहवाचन, पल्लवित पाठवाचन, अग्निस्थापन, गृहयज्ञ, नैवेद्य, आरती व प्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक ग्रामस्थांची भजने व इतर कार्यक्रम, २७ ला सकाळी ७.३० वाजता स्थापित देवतापूजन, पाठहवन, बलिदान पूर्णाहुती, अभिषेक नैवेद्य, सांगता अधिग्रहण, आरती, गाऱ्हाणे व प्रसाद सकाळी, ११ वाजता श्रींची महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७ वाजता स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने, रात्री ९ वाजता इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी आई भवानी तरुण उत्साही मंडळ, पारकरवाडी यांनी केले आहे.
---
वातावरण बदलामुळे मलेरियाचा धोका
कणकवली : वाढलेले तापमान, अवकाळी पाऊस तर कधी दमट हवामान अशा स्वरूपातील विस्कळित ऋतुचक्र व तापमानामुळे विषाणू, जंतू, डास, माश्‍यांसाठी पूरक वातावरण निर्माण होत आहे. साधारणपणे हे जीवजंतू ओल्या जागी, जिथे अन्न मिळेल तिथे राहायचे, ते आता वाढलेल्या तापमानात, प्रतिकूल परिस्थितीतही टिकाव धरू लागले आहेत, असे निरीक्षण जागतिक मलेरिया दिवसाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवले आहे. त्यामुळे भविष्यात डेंगी, चिकन गुनिया व मलेरिया या आजारांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरियामुळे आजही दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होतो तर दरवर्षी मलेरियाच्या २० कोटी प्रकरणांची नोंद होते. अनोफिल्स डासांच्या मादीमुळे मलेरिया होतो. अनोफिल्स डासांच्या ४०० हून जास्त प्रजाती आहेत.
-----
लावण्या बांदल राज्यात दुसरी
पेण : पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळेतील दुसरीत शिकणारी लावण्या विनोद बांदल हिने राजमुद्रा प्रिंट आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत ४०८ विद्यार्थी, तर निबंध स्पर्धेत ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील पहिली ते चौथीच्या ११४ विद्यार्थ्यांना आणि ३४ मुलांनी निबंध स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवले आहे. स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित केले आहे. स्पर्धेमध्ये लावण्या हिचा राज्यस्तरावर दुसरा क्रमांक आल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने, कार्याध्यक्ष प्रशांत ओक, उपकार्याध्यक्ष संजय कडू, शाळेच्या मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, शिक्षक धनाजी घरत, मानद चिटणीस सुधीर जोशी आदींनी लावण्याला शुभेच्छा दिल्या.
--
गाईला गटारातून काढण्यात यश
मुरूड : मुरूड-गावदेवी पाखाडी येथील रस्त्यालगतच्या मोठ्या गटारात गाय पडल्‍याची माहिती रविवारी (ता. २३) दुपारी पाखाडीतील रहिवाशांना कळली. गटारातून बाहेर पडण्यासाठी गाय प्रयत्न करत होती. काही नागरिकांनी गाईला काढण्यासाठी प्रयत्न केला; परंतु खोल खड्ड्यातून वर काढणे अशक्य झाले. अखेर सिद्धेश कोलंबेकर यांनी अग्निशमन दलाचे अभिजित कारभारी यांच्याशी संपर्क साधला. कारभारी व त्यांच्या टीमने जेसीबीच्या साह्याने गाईला रस्सी बांधून सुखरूप बाहेर काढले. मंगेश शामा, विनय तळेकर, ओंकार पोतदार, लिशांत मुकादम यांनी प्रसंगावधान राखत गाईची सुटका करण्यात मोलाचे सहकार्य केले. याआधीही पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्‍या हरणांच्या जोडीला गावातील तरुणांनी सुखरुप काढण्याची घटना घडली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com