
चिपळूण-डॉ. आंबेडकर समाजभवनाचा वर्धापन दिन उत्साहात
ratchl254.jpg-
98517
चिपळूणः कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला.
----------
डॉ. आंबेडकर समाजभवनाचा वर्धापन दिन उत्साहात
पिंपळीत विविध कार्यक्रम; मी रमाई बोलतेय एकांकिका लक्षवेधी
चिपळूण, ता. २५ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर भाष्य करणारी ‘मी रमाई बोलतेय’ या एकांकिकेने सर्वांचेच लक्ष वेधले. सोबतच ‘होम मिनिस्टर’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने माता रमाई महिला मंडळाच्या सर्व महिलांनी कार्यक्रमात सहभागी होत उत्स्फूर्त आनंद घेतला.
तालुक्यातील पिंपळी येथे या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बौद्धजन हितसंरक्षक समिती, तिसगाव पूर्व विभाग गट क्रमांक दोन स्थानिक व मुंबई आणि माता रमाई महिला मंडळ तिसगाव विभाग आयोजित संयुक्त जयंती महोत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवनाचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. मी रमाई आंबेडकर बोलतेय या कार्यक्रमाचे सादरीकरण माता रमाई महिला मंडळाच्या सौ मनीषा गमरे यांनी केले. माता रमाई यांच्या वेशभूषेमध्ये उत्तम प्रकारे एकांकिका सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली.
सर्व महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे निवेदन सखी थरवळ यांनी केले. कार्यक्रमात विविध फेऱ्या घेण्यात आल्या. सर्व महिलांचा सहभाग विविध प्रकारच्या स्पर्धा व खेळातून घेण्यात आला. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमुळे एक वेगळाच आनंद सर्व महिलांना त्यातून मिळाला. पहिल्या तीन विजेत्या महिलांना पैठणी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम प्रीती जाधव (दळवटणे), द्वितीय- राजश्री मोहिते (पिंपळी बुद्रुक), तृतीय- विनया मोहिते (कोळकेवाडी) आणि उत्तेजनार्थ दोघींना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये सौ. निकिता नितीन कांबळे (अडरे) व स्वाती सचिन मोहिते (कोळकेवाडी) यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिसगाव विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महिला मंडळाच्या कार्यकर्त्या शुभांगी गमरे, सुषमा गमरे, मनीषा मोहिते, मानसी पवार, निर्मला मोहिते, मनीषा गमरे, वंदना जाधव, विनया मोहिते आदींनी विशेष परिश्रम घेतले.