आपत्तीकाळासाठी २०० जणांची फौज तयार

आपत्तीकाळासाठी २०० जणांची फौज तयार

98714
सिंधुदुर्गनगरी ः आपत्तीकाळासाठी सज्ज झालेली ‘आपदा मित्र’ टीम.

आपत्तीकाळासाठी २०० जणांची फौज तयार

आपदा मित्र संकल्पना; प्रशासनाकडून प्रशिक्षण सुरू


सिंधुदुर्गनगरी ः नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आणि आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्ह्यातील २०० युवक-युवती (आपदा मित्र) यांना सर्वतोपरी प्रशिक्षित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्वतयारीनिशी आपत्तीशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पावसाळा कालावधीत जिल्ह्यात पूरस्थिती, दरड कोसळणे, चक्रीवादळ, वीज पडणे, अपघात अशा विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. अशावेळी तत्काळ मदतकार्य करून नागरिकांचे जीव वाचविता यावेत, यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० युवक- युवतींना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ९६ जणांना प्रशिक्षित करण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात १०४ तरुण-तरुणींना प्रशिक्षण देण्यात आले.
केंद्र व राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. जिल्ह्यातील २०० युवक- युवतींना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करून दोन टप्प्यांत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीकाळात कशाप्रकारे मदत कार्य करावे, नागरिकांचा जीव वाचविण्यासाठीच्या विविध उपायोजना याबाबत माहिती व प्रात्यक्षिक तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत ‘आपदा मित्र’ प्रशिक्षणार्थींना दिले आहे. १२ दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येऊन तंदुरुस्तीसाठी योगा, विविध कार्यक्रमांद्वारे अन्य मार्गदर्शन केले आहे. पूर, रस्ते अपघात, चक्रीवादळ, आग लागणे या सर्व प्रकारच्या आपत्ती वेळी काय करावे, नागरिकांचे जीव कसे वाचवावेत, त्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा वापर कसा करावा, रबरी बोट कशी चालवावी आदी सर्व प्रकारचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले आहे.
मालवण येथील आपत्कालीन ग्रुप, आंबोली आपत्कालीन मदत पथक, सांगेली आपत्कालीन मदत पथक यांच्या सहकार्याने तसेच आपत्ती व्यवस्थापनबाबत तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २०० तरुण-तरुणी (आपदा मित्र) यांना प्रशिक्षित करण्यात आले.
त्यांना आंबोली कावळेसाद, महादेवगड पॉईंट, नांगरतास, विविध समुद्र किनाऱ्यांवर जाऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा अनुभव प्रशिक्षण कालावधीत देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्याची ‘आपदा मित्र’ टीम परिपूर्ण प्रशिक्षित झाली आहे. प्रत्येक आपत्कालीन वेळी यांच्या सहकार्याने तत्काळ मदतकार्य करता येणार आहे. या सर्व प्रशिक्षणार्थींना स्कुबा डायविंग, रबरी बोट चालविणे, ट्रेकिंग, आगीपासून बचाव आदी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले आहे. प्रत्येक आपत्तीशी सामना करण्यासाठी मानसिकदृष्ट्या परिपूर्ण बनविण्यात आले आहे. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केले जात आहे. आपदा मित्रांना प्रशासनाकडून अधिकृत ओळख पत्र लवकरच देण्यात येणार आहे.
...............
चौकट
तालुका निहाय प्रशिक्षित आपदा मित्र
जिल्ह्यात प्रशिक्षित आपदा मित्रांची फौज तयार करण्यात आली आहे. यामध्ये देवगड तालुक्यात ३२, मालवण ८, दोडामार्ग १८, सावंतवाडी ३१, कणकवली ४९, वैभववाडी २१, कुडाळ २५, तर वेंगुर्ले तालुक्यात १६ प्रशिक्षित आपदा मित्रांचा समावेश आहे.
...............
पर्यटकांसाठी सुरक्षा सेवा
जिल्ह्यातील प्रशिक्षित आपदा मित्र आंबोली कावळेसाद पॉईंट, कुणकेश्वर, देवबाग, तारकर्ली, भोगवे, विजयदुर्ग अशा समुद्र किनारपट्टीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सद्यस्थितीत सेवा बजावत आहेत.
..............
पाच लाखाचे विमा संरक्षण
प्रशिक्षित आपदा मित्रांना भविष्यात मदतकार्य करताना दुर्घटना घडून मृत्यू आल्यास त्यांना पाच लाखाचा विमा लाभ दिला जाणार आहे. जायबंदी झाल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
................
वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रशिक्षण
आपत्तीवेळी वीजपुरवठा सुरू राहिल्याने विद्युत तारांना स्पर्श होऊन अनेकांचे बळी जातात. अशावेळी वीजपुरवठा खंडित करणे याबाबत माहिती देण्यात आली. यासाठी त्यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत एक महिन्याचा प्रशिक्षण कोर्स दिला जात आहे.
...............
शोध बचावासाठी साहित्य उपलब्ध
आपत्ती काळात लाईफ जॅकेट ६०७, लाईफ बोट २६६, एलईडी लाईट टॉवर ४२, रबरी बोटी २५, लाकूड कापण्याचे यंत्र २३, टॉर्च २००, स्कुबा सेट २ यांसह विविध प्रकारचे आवश्यक साहित्य उपलब्ध करून ठेवण्यात आले आहे.
..............
कोट
नैसर्गिक आपत्ती काळात नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पूर्वनियोजन केले जात आहे. संबंधित विभागांना सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील २०० तरुणांना ‘आपदा मित्र’ म्हणून प्रशिक्षित केले आहे. आपत्तीत होणारी मनुष्यहानी, मालमत्तेचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे पूर्वतयारी केली आहे.
- राजश्री सामंत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com