रत्नागिरीचे ‘पहिले पाऊल’ उमटणार राज्यभरात

रत्नागिरीचे ‘पहिले पाऊल’ उमटणार राज्यभरात

रत्नागिरीचे ‘पहिले पाऊल’ उमटणार राज्यभरात
पहिलीत दाखल मुलांची शाळापूर्व तयारी ;प्रत्येक वाडीवस्तीवर
रत्नागिरी, ता. २६ः जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दोन वर्षापूर्वी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पहिले पाऊल’ हा उपक्रम राबवला होता. आता याची दखल राज्य शासनाने घेतली असून हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरीच्या शिरपेचात या उपक्रमाने मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करण्यासाठी ‘पहिले पाऊल’ या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. प्रारंभी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची सुरवात होणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राज्यभरात राबवला जाणार असल्याने समग्र शिक्षा अभियान प्रकल्पाने हालचाली सुरू केल्या आहेत.
‘पहिले पाऊल’ या कार्यक्रमासाठी राज्यभरातील शाळांमध्ये मागील काही महिन्यांपासून नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्याची सुरवात होणार आहे. ३० एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरवात होईल; तर कोल्हापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी जिल्ह्यांत शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या माध्यमातून उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.ग्रामीण भागात शालेय शिक्षण विभागासोबत महिला बाल विकास, स्थानिक सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पहिलीत दाखल मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी ‘पहिले पाऊल’ महत्त्वाचे ठरणार आहे. हा कार्यक्रम राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर राबवला जाणार असल्याने त्यातून शाळेतील विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या वाढण्यास मदत होईल. ‘पहिले पाऊल’ कार्यक्रमांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये मेळावे होणार आहेत. या उपक्रमात विशेषकरून पालकांना सहभागी करून घेण्यात आले होते.दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हा उपक्रम जिल्हाभर राबवला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सध्याही मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव विविध उपक्रम राबवत आहेत. ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातही त्यांचा मोलाचा वाटा होता.
--------------------------
चौकट
काय आहे हा उपक्रम
प्रवेश घेणाऱ्या पाल्याच्या पालकांना अगोदरच त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली जाते. त्यांना मुलांच्या मनातील भीती कशी दूर करायची, याचे मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर त्यांच्या कृतीतून मुलांना शिक्षण देण्यात येते. उदा. गणितातील संकल्पना सांगण्यासाठी वस्तू आणायला सांगण्याच्या सूचना देणे. असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
---------------------------------------
चौकट
दुसरा टप्पा जून महिन्यात सुरू
‘पहिले पाऊल’ उपक्रमाचा दुसरा टप्पा जून महिन्यात सुरू होईल. त्यावेळी शालेय शिक्षण, महिला व बालविकास आणि सहभागी घटकांनी सहभागी होऊन प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शाळा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन माता-पालकांना, मुख्याध्यापक व गावकर्‍यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
----------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com