
वेरली शाळेचा हीरक महोत्सव
वेरली शाळेचा
हीरक महोत्सव
मालवणः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक वेरली शाळेचा शतकोत्तर हीरक महोत्सव ४ ते ६ मे या कालावधीत साजरा होणार आहे. ४ ला सकाळी १० वाजता उद्घाटन व शोभायात्रा, दुपारी ४ वाजता शाळेचे शिक्षक आणि मान्यवरांचा सत्कार, रात्री १० वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ५ ला रोजी सकाळी ११ वाजता नेत्रशिबिर आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, रात्री १० वाजता आजी-माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांचा कार्यक्रम ''महाराष्ट्राची लोकधारा,'' ६ ला सकाळी १० वाजता श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, भजने, रात्री १० वाजता बाळकृष्ण दशावतार, कोळंब यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाला मालवणचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, वडाचापाटचे केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
....................
वेंगुर्लेत मंगळवारी
''प्रलय'' नाट्यप्रयोग
वेंगुर्लेः येथील श्री देवी भराडी देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा २ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. श्री देवी भराडीची विधीयुक्त पाद्यपूजा, ९ वा. सुहासिनींसाठी कुंकुमार्जन, १० वा. सत्यनारायण महापूजा, १२.३० वा. महाआरती, महाप्रसाद, सायं. ४ वा. गोवा येथील भजनी मंडळाचे भजन, रात्री ८ वा. कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचे १६ ट्रिकसिनयुक्त ''त्रिखुर ब्रह्मांड ''प्रलय'' हे नाटक होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवी भराडी प्रासादिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
...............
सावंतवाडीत मंगळवारी
''भगवद्गीता'' कोर्स
सावंतवाडीः येथील हरे कृष्ण संस्कार केंद्र (इस्कॉन) भटवाडी कुणकेरी रोडवरील मंदिरात रविवारी (ता. ३०) एकदिवसीय भगवद्गीता कोर्स आयोजित केला आहे. या कोर्समध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काळ, कर्म तसेच चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट घटना का घडतात, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत. गौरांग प्रभू (पुणे इस्कॉन) हे या अभ्यास वर्गात मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ८ वाजता या कोर्सचे उद्घाटन होऊन सुरुवात होईल. सर्वांनी या कोर्समध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन हरे कृष्ण संस्कार केंद्र (इस्कॉन) यांच्यामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश रेडकर यांच्याशी संपर्क साधावा.
...................
संभाजीराव भिडेंचे
मळेवाडला व्याख्यान
मळेवाडः ''३२ मण हिंदवी स्वराज्य सिंहासन'' या विषयी मळेवाड जंक्शन येथे सोमवारी (ता. १) सायंकाळी ५ वाजता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. भिडे गुरुजींचे व्याख्यान प्रथमच मळेवाड या गावी होत आहे. गुरुजींच्या तेजस्वी-ओजस्वी वाणीतून देव, देश, धर्म समजण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्था व मळेवाड ग्रामस्थांनी केले आहे.
................