कणकवलीत ‘जत्रा शासकीय योजनांची’

कणकवलीत ‘जत्रा शासकीय योजनांची’

99079
कणकवली ः येथील तहसील कार्यालातील बैठकीला प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी मार्गदर्शन केले. शेजारी रमेश पवार, अरूण चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते. (छायाचित्र ः तुषार सावंत)


कणकवलीत ‘जत्रा शासकीय योजनांची’

प्रांताधिकारी कातकर; प्रत्येक योजना लाभार्थींपर्यंत पोहचवा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २८ ः तालुकास्तरावरील शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोचला पाहिजे. यासाठी पुढील महिन्याभरात नियोजनबद्ध काम करून तालुक्यातील १५ हजार लाभार्थींचे उद्दिष्ट पूर्ण करूया, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आज येथे केले. १५ मे पर्यंत ‘शासकीय योजनांची जत्रा’, हा उपक्रम राबविण्यात येणार असून या नियोजनाची बैठक आज प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसील कार्यालयात झाली.
यावेळी तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, पंचायत समितीस्तर तालुका कृषी अधिकारी सुभाष पवार आदी अधिकारी उपस्थित होते. येथील तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये प्रांताधिकारी श्री. कातकर यांनी शासनाच्या नव्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी राज्यस्तर तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे आदींसह शासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध बँक शाखांचे व्यवस्थापक या बैठकीला उपस्थित होते. राज्य शासनाच्यावतीने शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी आणि लाभार्थींना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा होणार आहे. तालुकास्तरावर दोन दिवसांचा हा उपक्रम आहे. यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी प्रांताधिकाऱ्यांची निवड केली आहे.
प्रांताधिकारी म्हणाले, ‘‘येत्या पंधरा मे पर्यंत ‘जत्रा शासकीय योजनांची’ या उपक्रमाअंतर्गत सूक्ष्म नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक विभागाने आपल्या योजनेची वैयक्तिक आणि सामूहिक लाभार्थींसाठी योजनेची निवड करावी. प्रत्येक योजना लाभार्थीपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक विभागाने लाभार्थींची यादी तयार करून, तात्काळ प्रस्ताव तयार करावा. कणकवली तालुक्यासाठी पंधरा हजाराचे उद्दिष्ट आहे. तालुकास्तरावर दोन दिवसांचा हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्राप्त प्रस्तावांची वेळोवेळी माहिती तालुका समितीच्यावतीने काटेकरपणे घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी हा उपक्रम आहे. कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने ही योजना आणली आहे. शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित केल्या आहेत; मात्र, अशा योजनांचा लाभ नागरिकांना होत नाही. शासकीय यंत्रणेने यासाठी प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी नियोजन केले आहे. प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोचून त्याच्यासाठी असलेल्या योजनेचा लाभ द्यावा. या योजनेचा आढावा आज प्रांताधिकाऱ्यांना घेतला. वेगवेगळ्या शासकीय विभागाकडून माहिती घेण्यात आली. यावेळी एसटीच्यावतीने विविध योजनांची माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वितरण, विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचाही लाभ या उपक्रमात दिला जाणार आहे. सामाजिक वनीकरण आणि वनविभागाकडून वृक्ष लागवडीसाठी लाभार्थींची निवड केली जाणार आहे. विविध बँकांच्या माध्यमातून असलेल्या वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजनांचे कर्ज प्रस्तावही तयार केले जाणार आहेत. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना एकाच वेळी पूर्ण केल्या जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात लाभार्थी शोधले जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक लाभार्थींसाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
--
नगरपंचायत क्षेत्रामध्येही विविध योजना
नगरपंचायत क्षेत्रामध्येही विविध योजना राबवल्या जाणार आहेत. नगरपंचायतीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या आणि सामूहिक लाभाच्या योजनांचीही माहिती देण्यात आली. नगरपंचायतीच्या तरतुदीनुसार ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहे. त्या त्या घटकापर्यंत पोचवण्याची जबाबदारी नगरपंचायतीला दिली आहे. पोलिस विभाग, एसटी महामंडळ, विविध बँका, पंचायत समितीच्या विविध विभागाच्या योजना, भूमिअभिलेख, महसूल, कृषी विभाग, वन आणि सामाजिक वनिकरण, जिल्हा ग्रामीण विकास योजना, सार्वजनिक बांधकाम अशा विविध शासकीय खात्यांच्या योजना एकाच वेळी लाभार्थींपर्यत पोचवल्या जाणार आहेत.
----
शासकीय उपक्रमावर एक नजर
* १५ मेपर्यंत उपक्रम राबवणे
* २५ मे पर्यंत लाभार्थींपर्यंत माहिती पोचवणे
* तालुक्याला १५ हजार लाभार्थींचे उद्दिष्ट
* तालुकास्तरावर दोन दिवसांचा उपक्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com