रत्नागिरी-सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-सदर
रत्नागिरी-सदर

रत्नागिरी-सदर

sakal_logo
By

२९ (टुडे पान २ किंवा ३ साठी)

इये साहित्याचिये नगरी ..........लोगो

-rat२८p२१.jpg ः
९९१३९
गोपाळ कृष्ण गोखले
-rat२८p२२.jpg ः
९९१४०
प्रकाश देशपांडे
---
नामदार गोपाळ कृष्ण गोखले

ज्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहून खुद्द इंग्रज लोक विस्मयचकित व्हायचे ते गोपाळ कृष्ण गोखले हे या अपरांतभूमीने दिलेले देशपातळीवरील नेते. गुहागर तालुक्यातील कोतळूक गावी ९ मे १८६६ ला जन्मले. गोखले घराणे मूळ वेळणेश्‍वरचे; मात्र गोपाळ कृष्णांचे पूर्वज आजच्या चिपळूण तालुक्यातील ताम्हणमळा या गावचे खोत होते. वडिलांचा पारंपरिक शेती हा व्यवसाय. कोकणातील शेती म्हणजे हातातोंडाची गाठ एवढ्याच उत्पन्नाची. त्यामुळे कृष्णाजीपंताचे ज्येष्ठ चिरंजीव गोविंदराव हे कागल जहांगिरीत कारकून म्हणून नोकरी करत होते. त्यांनी आपल्या भावाला गोपाळला कागल येथे आणले. कागलच्या मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला दाखल झाले. तिथून मुंबर्इला एलन्फिन्स्टन महाविद्यालयातून १८८४ ला गणित विषय घेऊन पदवी प्राप्त केली. सरकारी नोकरी स्वीकारायची नाही, हे निश्‍चित करून गोपाळ कृष्ण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले. देशभक्तीने प्रेरित असलेल्या गोखल्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यपद स्वीकारले. पुढे फर्ग्युसन कॉलेजला प्राध्यापक झाले. त्यांचा विषय जरी गणित असला तरी ते कॉलेजमध्ये इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्रही शिकवू लागले.
गोपाळरावांना वकील व्हायचे होते. वकिलीच्या क्षेत्रात उत्तम इंग्रजी येणे गरजेचे हे जाणून त्यांनी पद्धतशीरपणे इंग्रजीचा व्यासंग सुरू ठेवला. उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तके त्यांनी वाचली. नुसती वाचली नाहीत तर आत्मसात केली. ज्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजीचा श्रीगणेशा केला त्याच राजाराम कॉलेजात १८८५ ला त्यांनी ‘ब्रिटिश रियासतीतील हिंदुस्थान’ या विषयावर इंग्रजीत पहिले व्याख्यान दिले. या व्याख्यानाला कोल्हापूरचे रेसिडेंट ली वॉर्नर उपस्थित होते. गोपाळरावांचे इंग्रजीवर प्रभूत्व पाहून तेही भारावले.
१८९६ ला गोखले पदवीधरांच्यामधून मुंबर्इ विद्यापिठाचे फेलो म्हणून निवडून आले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते विद्यापिठाची फेलो होते. महत्वाचे म्हणजे लॉर्ड सिडनहॅम यांनी विद्यापिठाच्या अभ्यासक्रमातून इतिहास काढून टाकायचा प्रयत्न केला. गोखल्यांनी त्याला प्रखरपणे विरोध केला आणि हा प्रयत्न हाणून पाडला. लो. टिळक आणि आगरकरांनी सुरू केलेल्या ‘मराठा’ या इंग्रजी वर्तमानपत्रातून गोखल्यांनी अनेक लेख लिहिले. पुढे सुधारककाग्रणी गोपाळराव आगरकरांच्या ‘सुधारक’ च्या इंग्रजी विभागाचे १८८८ ते १८९२ संपादक म्हणून काम केले.
समाजहितार्थ कार्य करण्यासाठी १८७० ला पुण्यात सार्वजनिक सभेचे काम करू लागले. लवकरच सभेचे कार्यवाह म्हणून त्यांची निवड झाली. रानडे प्रभृती नेतेमंडळी सदनशीर मार्गाने देशकार्य करावे, अशा मताची तर साम दाम दंडभेद अनिवार्य आहे. प्रसंगी इंग्रज सत्तेविरुद्ध संघर्षाला पर्याय नाही, अशा मताचे लो. टिळक स्वाभाविकच त्या काळी लोकमान्यांचा जनमानसावर प्रचंड पगडा होता. पुणे सार्वजनिक सभेच्या १८९५ ला झालेल्या निवडणुकीत टिळकपक्ष प्रचंड बहुमताने निवडून आला; मात्र कार्यवाहपदी गोपाळरावांची निवड झाली होती. अखेर १८९६ ला गोखल्यांनी पुणे सार्वजनिक सभेचे त्यागपत्र दिले. गोपाळरावांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यात भाग घ्यायला सुरवात केली. पुण्याला भरलेल्या प्रांतिक काँग्रेस परिषदेचे ते कार्यवाह होते. या अधिवेशनात लो. टिळक आणि गोखले यांनी एकत्रित काम केले.
१८९९ ला गोखले मुंबर्इत विधिमंडळावर निवडून आले. गोखले फिरोजशाह मेहता आदी नेते इंग्रजांशी सनदशीर मार्गाने संघर्ष करावा या मताचे होते. त्यामुळे काँग्रेसपक्षात जहाल आणि मवाळ असे दोन गट निर्माण झाले. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या मवाळगटाचे नेतृत्व गोखले यांच्याकडे गेले. थोड्याच काळात ते काँग्रेसचे देशापातळीवरचे नेते म्हणून विख्यात झाले. १९०५ ला बनारसला भरलेल्या अ. भा. काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. त्या वेळी त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात लॉर्ड कर्झनच्या हुकूमशाही वृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करून हिंदुस्थानला वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा देण्यातच इंग्लडला तरणोपाय आहे, हे सांगितले. नेमस्त असलेल्या गोखल्यांचे अध्यक्षीय भाषण इंग्रज सरकारला आणि त्यांची री ओढणाऱ्यांना चांगलेच झोंबले. सरकार धार्जिण्या मुंबर्इ टाइम्सने गोखले यांनी ‘नेमस्तपणा सोडला ही चूक झाली’, असे लिहून गोखल्यांच्या भाषणावर टीका केली होती.
गोखल्यांनी मनोमन जी आध्यात्मिकता स्वीकारली होती त्यासाठी संन्यस्त वृत्तीने सामाजिक आणि राजकीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटना हवी होती. १२ जून १९०५ ला ‘भारत सेवक समाज‘ ही संस्था स्थापन केली. संस्थेच्या सदस्याला शपथ घ्यायला लागायची. त्यातील एक वाक्य आजच्या सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी आवर्जून वाचायला हवंय. ते वाक्य असे, ''देशाची सेवा करताना स्वार्थ लोलुपता मनाला येऊ देणार नाही, ज्याची आज प्रकर्षाने उणीव भासते. सात्विक राजकारणाचा आदर्श म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले.''
भारतीयांची कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला प्रस्थान केले. ठिकठिकाणी व्याख्याने दिली. आफ्रिकेतील भारतीयांच्या समस्या भीषण होत्या. त्यांना गुलामांसारखी वागणूक मिळत होती. गोखले आफ्रिकेत गेले. तिथल्या वसाहतीवादी सरकारसमोर गोखल्यांनी भारतीयांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, अशी मागणी केली. ही सगळी धावपळ सुरू असतानाच त्यांना हृदयविकार आणि जोडीला मधुमेह सुरू झाला. लोकमान्य आणि नामदार गोखले यांचे वैचारिक मतभेद होते; मात्र गोखल्यांचा निधनाचा टिळकांना जबरदस्त धक्का बसला. त्यांच्या अंत्ययात्रेच्या सभेत लोकमान्य म्हणाले. ‘भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न, श्रमिक राजपुत्र चिरविश्रांती घेत आहे. त्यांच्याकडे पाहा आणि प्रयत्न करा त्यांच्या अनुकरणाचा.’
२०२२ ला इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांनी शपथ घेतली. १९१४ ला आंग्लकवी सेसिल याने ‘गोखले जर इंग्लंडला जन्माला आले असते तर ते इंग्लंडचे पंतप्रधान झाले असते’, अशा शब्दात गोपाळ कृष्णांचा गौरव केला होता. १९१४ ला जे झाले नाही ते २५ ऑक्टोबर २०२२ ला झाले. गोपाळ कृष्णांचा भारतीय वारस ज्या इंग्लंनने दीडशे वर्षे भारतावर राज्य केले त्या इंग्लडचा एक भारतीय पंतप्रधान झाला. नामदार गोखल्यांचा आत्मा हे ऐकून नक्कीच सुखावला असेल.
*महात्माजींचे राजकीय गुरू
भारतीय राजकारणात ज्यांनी देशव्यापी नेतृत्व केले ते महात्मा गांधी. महात्माजींचे राजकीय गुरू असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्माजींची पहिली भेट पुण्याला झाली. १२ ऑक्टोबर १८९६ ला गांधीजी पुण्याला गोखले यांना भेटले. या भेटीबद्दल महात्माजी म्हणतात, ‘मला ते फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर भेटले. त्यांनी माझे प्रेमळ स्वागत केले आणि त्यांच्या वागण्याने लगेच माझे मन जिंकले. गोखले यांनी आपल्या हृदयात एक अनोखे स्थान व्यापले आहे.’ महात्माजी गोखल्यांचा उल्लेख ‘महात्मा गोखले धर्मात्मा गोखले’ असा करताना दिसतात. राजकारणाला आध्यात्मिकतेचे वळण लावण्याचे काम गोखल्यांनी केले. महात्माजींनी ‘गोखले माझे राजकीय गुरू’ या नावाचे पुस्तकही लिहिले.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)

-