
शासकीय कामात अडथळा अंगलट
शासकीय कामात अडथळा अंगलट
दोघांना शिक्षा; कणकवलीतील प्रकरणे, जिल्हा न्यायालयाचा निर्णय
ओरोस, ता. २८ ः शासकीय कामात अडथळा आणत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वेगवेगळ्या दोन प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. या दोन्ही प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
नागवे गावात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या तत्कालीन तलाठी शालिनी नारायण येडगे (रा. कणकवली) या तलाठी कार्यालयात शासकीय कर्तव्य बजावत असताना नंदकिशोर भिवा सुतार (वय ५७) याने हातात कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून जात जमिनीच्या सातबारासाठी मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी नंदकिशोरला जिल्हा न्यायाधीश श्रीमती जोशी यांनी दोषी धरुन २७ दिवसांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. तोडकरी व तपासिक अधिकारी म्हणून एपीआय सागर खंडागळे यांनी काम पाहिले. ही घटना २९ ऑक्टोबर २०२० ला नागवे तलाठी कार्यालयात घडली होती. या प्रकरणी आरोपी नंदकिशोरवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. या खटल्याची सुनावणी होऊन जिल्हा न्यायालयाने नंदकिशोरला बुधवारी शिक्षा सुनावली.
दुसऱ्या प्रकरणामध्ये फिर्यादी सुनील महादेव ठाकुर (रा. कणकवली) हे कणकवली न्यायालयात बेलीफ म्हणून काम पाहतात. ६ जून २०१९ ला संतोष नारायण राणे (रा. कणकवली) यांना वॉरंट देण्यासाठी गेले असता, संशयित संतोषने फिर्यादी (बेलीफ) श्री. ठाकुर यांना शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी संतोष नारायण राणे याला जिल्हा न्यायाधीश श्रीमती जोशी यांनी दोषी ठरवून १० दिवसांची भोगलेली शिक्षा कायम करुन २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. तोडकरी व तपासिक अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक बापू पांडूरंग खरात यांनी काम पाहिले. ही घटना ६ जून २०१९ ला घडली होती. या प्रकरणी आरोपी संतोषवर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. या खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने संतोषला बुधवारी शिक्षा सुनावली.
महाराष्ट्र शासनामार्फत दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाने प्रत्येक जिल्ह्यात ट्रायल मॉनिटरिंग सेलची स्थापना केली होती. पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी या सेलची स्थापना करून त्याद्वारे जिल्ह्यामध्ये विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या खटल्याच्या कामांवर देखरेख करुन दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, हेडकॉन्स्टेबल काळसेकर, महिला हेडकॉन्स्टेबल खानोलकर यांची नियुक्ती केली होती. या ट्रायल मॉनिटरिंग सेल मार्फत पोलिस ठाणे स्तरावर कोर्ट पैरवी यांच्याशी समन्वय साधून दैनंदिन कामकाज पहात असतात. त्यामुळे गुन्ह्याच्या दोष सिद्धीच्या प्रमाणामध्ये हळूहळू वाढ होऊन गुन्हेगारांना शासन होत असल्याचे दिसत आहे. या सेलच्या कामकाजावर अपर पोलिस अधीक्षक नितिन बगाटे वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये आरोपींना शासन व्हावे यासाठी पोलिस अधीक्षक श्री. अग्रवाल हे प्रयत्नशील आहेत.