पान एक-सिंधुदुर्गात 25 टक्के शिक्षक पदे रिक्त

पान एक-सिंधुदुर्गात 25 टक्के शिक्षक पदे रिक्त

सिंधुदुर्गात २५ टक्के शिक्षक पदे रिक्त
बदल्यानंतरचे चित्र ः भरती न झाल्यास शाळा चालवणे कठीण
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः जिल्हा शिक्षण विभागाला आंतरजिल्हा बदलीचे ग्रहण लागले असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असताना आता आणखी ४४६ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने मुक्त करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या ११११ वर पोचली आहे. जिल्हात शिक्षकांची २५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त झाल्याने ही पदे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी भरली न गेल्यास जिल्ह्यातील शाळा चालविणे शिक्षण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भाग आहे. या जिल्ह्यातील ग्रामीण भागासह दुर्गम भागातही प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण १३८० एवढ्या प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. मात्र, या शाळांमध्ये आवश्यक असलेल्या शिक्षकांची पदे भरली नसल्याने पालकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या (पट) कमी होत चालली आहे.
सिंधुदुर्गसाठी एकूण ३८९३ एवढी शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत ३२२७ पदे भरलेली आहेत, तर सेवानिवृत्त व अन्य कारणांनी ६६६ एवढी पदे रिक्त आहेत. त्यातच आणखी आंतरजिल्हा बदलीचे ग्रहण लागल्याने ४४६ एवढी पदे नव्याने रिक्त झाली आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण ११११ एवढी शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. यामध्ये पदवीधर ३१५, तर उपशिक्षक ७९६ पदांचा समावेश आहे.
शासनाने गेल्या १० ते १२ वर्षांत शिक्षकांची पदे भरलेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची शिक्षण व्यवस्था ढासळत चालली आहे. गेली १२ वर्षे भरती प्रकिया न झाल्याने जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांची संख्याही वाढत चालली असून, त्यांच्याकडून शिक्षकांच्या रिक्त पदावर सामावून घ्या, या मागणीसाठी संघर्ष सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाडी-वस्त्यांवर शाळा कार्यरत आहेत. मात्र, त्या ठिकाणी आवश्यक असलेले शिक्षक नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही रोडावत चालली आहे. जिल्ह्यातील मोठ्या संख्येच्या शाळांमध्येही आवश्यक असलेले शिक्षक दिले जात नसल्याने पालकांकडून आंदोलने होऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत आंतरजिल्हा बदलीने तब्बल ४४६ शिक्षकांना प्रशासनाने मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती आणखीनच बिकट बनली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात १५ जूनपासून प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. शाळा सुरू होण्यापूर्वी रिक्त असलेली शिक्षकांची पदे भरली न गेल्यास शिक्षण विभागासाठी शाळा चालविणे ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परजिल्ह्यातील शिक्षकांची संख्या मोठी आहे. दरवर्षी आंतर जिल्हा बदलीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना मुक्त केले, तर येथील रिक्त पदांची टक्केवारी वाढून शिक्षण व्यवस्था सुरळीत चालवणे कठीण होते. अशा प्रकारे गेले अनेक वर्षे आंतरजिल्हा बदलीचे ग्रहण सोडविण्यात प्रशासनाचा वेळ वाया जात आहे आणि याचा शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. यासाठी नव्याने होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये कायमस्वरूपी पर्याय म्हणून स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी येथील नागरिक व लोकप्रतिनिधींकडून होऊ लागली आहे.
----------------
चौकट
शासनाने योग्य
पर्याय निवडावा
शासनाने नव्याने शिक्षक भरती करताना त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यात नियुक्ती दिल्यास आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. स्थानिक शिक्षक नियुक्त झाल्यास विद्यार्थ्यांना अडचणीचा ठरणारा बोलीभाषेचा प्रश्नही निकाली लागणार असून शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे आगामी शिक्षक भरती करताना शासनाने स्थानिक उमेदवारांना त्यांच्याच जिल्ह्यात सामावून घेण्याचा निर्णय घेणे गरजेचे बनले आहे. अशा निर्णयाने प्रत्येक जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा सुधारून प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या बोली भाषेत अध्यापन करणारे शिक्षक मिळू शकतील, तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांकडे विद्यार्थी आकर्षित होऊन शाळांची पट संख्याही वाढण्यास मदत होणार आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतर जिल्हा बदली पात्र शिक्षकांची संख्या मोठी होती. त्यांना मुक्त करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक संघटनांची होती. त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपल्याने ४४६ शिक्षकांना आंतर जिल्हा बदलीने मुक्त करण्यात आले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या वाढली असून, जिल्ह्यात शिक्षकांची ११११ एवढी पदे रिक्त झाली आहेत. ही पदे तातडीने भरावीत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com