
अधुनिकतेतही कीर्तन प्रभावी माध्यम
99328
कणकवली : येथील कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय आंग्रे, बंडू हर्णे, डॉ. राजश्री साळुंखे आदी.
अधुनिकतेतही कीर्तन प्रभावी माध्यम
नीतेश राणे : कणकवलीत कीर्तन महोत्सवाला प्रारंभ
कणकवली, ता. २९ : सोशल मीडिया, यू ट्यूबच्या जमान्यात वेगवेगळे विषय मांडण्यासाठी आपण सगळी माध्यमे वापरतो; पण आजही छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थाने इतिहास लोकांपर्यंत पोहोचायचा असेल, तर कीर्तन हे महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.
सांस्कृतिक संवर्धन कणकवलीच्या कीर्तन महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी आमदार श्री. राणे बोलत होते. विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर हा कीर्तन महोत्सव सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत सुरू आहे. उद्या (ता. ३०) या महोत्सवाचा समारोप होणार आहे. कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांचा सत्कार नीतेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, डॉ. राजश्री साळुंखे, भाजप जिल्हा सचिव मनोज रावराणे, संस्कृती संवर्धन मंच अध्यक्ष दीपक बेलवलकर, डॉ. संदीप साळुंखे, प्रसाद देवस्थळी, विलास खानोलकर, परशुराम झगडे, सुहास हर्णे, प्रा.हरिभाऊ भिसे, संजय राणे, राजेंद्र तवटे, विश्वनाथ गवंडळकर, दादा कोरडे आदी उपस्थित होते.
---
कणकवलीत महोत्सव हे भाग्य
राणे म्हणाले, ‘‘शिवरायांचा खरा इतिहास हा प्रत्येक पिढीपर्यंत गेला पाहिजे. सध्या हिंदूविरोधी विचारांना मोठे करण्याचं काम सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या वातावरणामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवराय घराघरांत पोचविण्याचा उपक्रम महत्त्वाचा आहे. शिवरायांच्या विचारांवर चालणारा मावळा म्हणून मला खऱ्या अर्थाने आज समाधान वाटलं. माझ्या मतदारसंघांमध्ये, माझ्या कणकवलीमध्ये कीर्तन महोत्सव होतोय. तोही छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर आहे, हे आमचे भाग्य आहे.’’