साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

देवरुखात आज महास्वच्छता अभियान
साडवली ः देवरूख शहरातील नागरिकांनी एकत्र येत आपलं देवरूख, सुंदर देवरूख ही स्वच्छतेची चळवळ उभी केली आहे. याच चळवळीचा भाग म्हणून कामगार दिनी (ता.१) सकाळी ८ ते १० या वेळेत सर्व विभागात स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे. संत निरंकारी मंडळाचे श्री सदस्यही यात सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. बाजारपेठ, सोळजाई मंदिर, मातृमंदिर चौक, स्टेट बॅंक रोड, स्वा. सावरकर चौक या मार्गावर अभियान राबवले जाणार आहे. विविध संस्था, मंडळे यातील कार्यकर्ते सहभागी होवून ही चळवळ अधिक बळकट करत आहेत. देवरूख नगरपंचायतीला राज्यात स्वच्छतेचा दुसरा क्रमांक मिळाल्याने शहरवासीयांची जबाबदारी वाढली आहे. यासाठी तालुक्यातून देवरुख शहरात येणाऱ्या नागरिकांनी कुठेही बाहेर कचरा, प्लॅस्टिक टाकू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.


दापोलीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा
दाभोळ ः दापोली नगरपंचायतीकडून शहराला करण्यात येणारा दररोजचा पाणी पुरवठा आता दोन दिवसाआड करण्यात आला आहे. अल-निनोच्या वाढत्या प्रभावामुळे नगरपंचायतीने हे नियोजन केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे जून महिन्यात व नंतरदेखील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच उन्हाळ्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची संभावना असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास विचारात घेता अचानक पाणीसाठा कमी होवू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती गंभीर होवू शकते. सध्या धरणामध्ये आजमितीस भरपूर प्रमाणात पाणी दिसत असले तरी अल-निनो प्रभावामुळे पाणी एकाएकी कमी होवून पाणी टंचांई भासू शकते. त्यामुळे पाण्याचे योजन करणे गरजेचे बनले असल्याने नगरपंचायतीकडून शहरामध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करण्याचे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.


दापोलीत आणखी एका उद्यानाची भर
दाभोळ ः दापोली शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर असलेल्या व अनेक वर्षे रखडलेल्या दापोली नगरपंचायतीच्या जागेत उद्यानाची निर्मिती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. नगरपंचायतच्या हद्दीत गणपती विसर्जन तलावाजवळ प्रशस्त असा बगीचा निर्मिती करण्याचे काम सुरू करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाला गती देण्यात आली आहे. ठाणे येथील कंपनीने या बागेच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. या बगीच्याच्या कामासाठी १ कोटी ३६ लाखांची निविदा काढण्यात आली होती. ठेकेदार कंपनीने कामाला सुरवात केली आहे. या बगीच्यामध्ये स्वच्छतागृहही उभारण्यात आले आहे. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उद्यान आहे. तसेच कोकबाआळी येथेही उद्यान आहे. मात्र ते नादुरुस्त असल्याने बंद आहे. त्यात आता नव्या बगीच्याची भर पडणार आहे.