कातळशिल्पकलेचा उगम कोकणातून

कातळशिल्पकलेचा उगम कोकणातून

rat30p31.jpg-
99633
रत्नागिरी : कातळशिल्प कार्यक्रमाप्रसंगी बोलताना तेजस गर्गे. शेजारी अखिलेश झा, सुधीर रिसबूड. (मकरंद पटवर्धन; सकाळ छायाचित्रसेवा)
-------
कातळशिल्पकलेचा उगम कोकणातून
तेजस गर्गे ; पांडवकाल सांगण्यापेक्षा सत्यशोधन आवश्यक
रत्नागिरी, ता. ३० : सर्वप्रथम कोकणातील कातळशिल्पं पाहिली तेव्हा काहीतरी वेगळे विश्व पाहिल्यासारखे वाटले. जे पाहिले ते सारे कल्पनेपलिकडचे होते. ते पाहिल्यावर अनेक प्रश्न डोक्यात घोंगावू लागले. भारतातील शिल्पकलांचा उगम अजंठा व वेरूळ येथे असल्याचे मानले जाते. मात्र भारतातील कातळकलेचा उगम हा कोकणातून झाला आहे, असे आता सांगावे लागणार आहे. कातळकलेचे कायमचे माध्यम यांचा उगम कोठे असे विचारले तर त्याचे उत्तर कोकणातून असेच द्यावे लागेल, असे प्रतिपादन पुरातत्त्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी केले.
कातळशिल्प जतन, संवर्धनासाठीच्या श्री प्रकल्पाच्या घोषणेप्रसंगी ते बोलत होते. गर्गे यांनी याप्रसंगी रत्नागिरीतील सुधीर रिसबूड व त्यांचे सहकारी यांनी ज्या चिकाटीने कातळशिल्पांचा पाठपुरावा केला त्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. ते म्हणाले की, २००९ साली रिसबूड यांचा ई मेल मला आला. त्यानंतर दीर्घकाळ तो ई मेल तसाच होता कारण मी दुसऱ्या ठिकाणी होतो. सुदैवाने स्थिती पालटली व रिसबुडांशी आमचा संपर्क झाला. या विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही कातळशिल्प पाहायला आलो आणि वेगळेच विश्व समोर आले. अजंठा वेरूळची शिल्पे पाहताना तेथे घोडे दिसत, अन्य प्राणी दिसत. मात्र कोकणातील कातळशिल्पात घोडा नाही, बैलही नाही. मग कोकणात घोडे कधी आले, बैल कधी आले, शेती कधी सुरू झाली. याचा शोध घेणे क्रमप्राप्त झाले. यावर संशोधन करणे आवश्यक ठरले. संशोधन करायचे तर त्यासाठी प्रश्न पडले पाहिजेत. संशोधन करताना दृष्टिकोन पूर्णपणे शास्त्रीय हवा. त्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रातील संस्था, तंत्रज्ञान जाणणारे लोक यांची मदत घेणे अपरिहार्य ठरले. त्यातूनच आजच्या श्री प्रकल्पाचा आराखडा बनला गेला.
गर्गे म्हणाले की, या प्रकल्पाशी ते भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत. त्यांच्या घरात कलेचा आणि शिल्पकलेचा वारसा आहे. आपल्या पूर्वजांनी कोणत्या पद्धतीने कला जोपासली असेल, याचा शोध घेतला पाहिजे. कोकणात यासाठी आवश्यक भूमीही तयार आहे. कोकणातील माणूस तसा साधाभोळा. भुताखेतांना मानणारा मग या महाभुताला (कातळशिल्पांना) तो कसा विसरला, असे सांगून आपण साऱ्या गोष्टी पांडवकालाशी जोडतो. परंतु सत्य काय ते उघड कसे होऊ शकते, यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास आवश्यक तो श्री प्रकल्पाद्वारे होणार आहे. त्याचा उपयोग काय असे काही जणांना वाटते. ज्यांना पैशांची भाषा कळते त्यांच्यासाठी सांगतो की छोट्या उक्षीसारख्या एका ठिकाणी ८० हजार लोकांनी भेट दिली, अशी शेकडो शिल्पे आहेत. जागतिक पातळीवर ती गेली तर दशलक्ष डॉलर्सची उलाढाल याच्या अनुषंगाने होईल.

चौकट
कातळशिल्पांचे डॉक्युमेंटेशन
श्री प्रकल्पात संपूर्णपणे कातळशिल्पांचे डॉक्युमेंटेशन होणार आहे. डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. शास्त्रीयदृष्ट्या ते अभ्यासले जाईल.जागतिक वारसास्थळांसाठी ९ ठिकाणांची प्राथमिक निवड झाली आहे. परंतु त्या पुढेही जाऊन काम करायचे आहे. उद्या युनेस्को आपल्याला विचारील की कातळशिल्प संवर्धन आणि जतनासाठी तुम्ही काय करणार, तुमची योजना काय, तर आपल्याला नेमकेपणाने उत्तर देता आले पाहिजे. युनेस्कोची अंतिम मोहोर उठण्यासाठी हे आवश्यक आहे, आपण ते कष्टाने मिळवायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com