
राजापूर-रिफायनरीचे वास्तव ग्रामस्थांनी समजून घ्यावे
-rat30p52.jpg
99698
राजापूर ः रिफायनरीसंबंधी बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी देंवेदर सिंह. या वेळी उपस्थित पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जयश्री गायकवाड आदी.
-rat30p53.jpg
99699
रिफायनरीसंबंधीच्या बैठकीला उपस्थित ग्रामस्थ.
लोगो-
बारसूचं रण
रिफायनरीचे वास्तव समजून घ्यावे
---
जिल्हाधिकारी; ग्रामस्थ सांगतील त्या गावात प्रशासन येईल
राजापूर, ता. ३० ः रिफायनरीसंबंधी वास्तव काय आहे, रिफायनरीसंबंधी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, हे ग्रामस्थांनी समजून घेणे गरजेचे आहे. शंका आणि प्रश्न विचारून त्याची माहिती समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासन गावांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधण्यास तयार असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिली. सध्या माती परीक्षण सुरू असून, त्यानंतर प्रकल्पाबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रिफायनरी प्रकल्पासंबंधी प्रशासनाकडून लोकांशी संवाद साधण्याचा निर्णय झाला असून, त्याप्रमाणे आज बारसू आणि धोपेश्वर येथील लोकांशी प्रांत कार्यालयात संवाद साधण्यात आला. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुळकर्णी, ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाले, अप्पर पोलिस अधिकारी जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सध्या सुरू असलेल्या माती परीक्षणाबाबत माहिती दिली. या प्रकल्पाबाबत प्रशासनाकडून सविस्तर माहिती दिली जाणार असून, त्यासाठी कोणत्या गावात कधी यावे, याची गावकऱ्यांनी माहिती द्यावी. त्याठिकाणी प्रशासन येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गावकऱ्यांनी गावाच्या विकासासह तालुका, जिल्हा, राज्य आणि देशासाठी या प्रकल्पाचा किती आणि काय फायदा होणार आहे, याचा प्राधान्याने विचार करावा. आरआरपीसीएल कंपनीकडूनही प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देऊन ग्रामस्थांच्या शंका सोडविल्या जातील. सरपंच, उपरसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा देशातील रिफायनरी अभ्यास दौराही आयोजित करण्यात येणार असल्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनीही सविस्तर माहिती दिली; तर श्रीमती गायकवाड यांनी आंदोलक ग्रामस्थांवर लाठीचार्ज झाला नसल्याचे सांगताना पोलिसांनी ग्रामस्थांना कशा प्रकारे सहकार्य केले, याची सविस्तर माहिती दिली. ‘एमआयडीसी’च्या अधिकारी श्रीमती खरमाले यांनीही प्रकल्पाविषयी लोकांना सविस्तर माहिती दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेत सुनील भणसारी, श्री. नांदलस्कर, इरफान चौगुले आदी ग्रामस्थांनी भाग घेत प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध मुद्यांन्वये चर्चा केली.