अरूण गांधी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरूण गांधी यांचे निधन
अरूण गांधी यांचे निधन

अरूण गांधी यांचे निधन

sakal_logo
By

९९९५२ - अरुण गांधी

अहिंसेचे पुरस्कर्ते अरुण गांधी यांचे निधन
कोल्हापुरात अंत्यसंस्कार, महात्मा गांधी यांचे ज्येष्ठ नातू

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू, अहिंसेचे पुरस्कर्ते व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक अरुण मणिलाल गांधी (वय ८९) यांचे आज पहाटे येथे निधन झाले. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘अवनि’ या संस्थेतच त्यांची प्राणज्योत मालवली. वाशी (ता. करवीर) येथील गांधी फाउंडेशनच्या जागेत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे ते वडील होत.
श्री. गांधी यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद, भारतीय स्थलांतरितांविरोधातील भेदभाव आणि हिंसाचाराचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी त्यांच्यासोबत सेवाग्राम आश्रमात १९४६ मध्ये दोन वर्षे वास्तव्य केले. तेथेच त्यांना अहिंसेची तत्त्वे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची माहिती मिळाली आणि पुढे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी अहिंसेच्या मार्गानेच सक्रिय सहभाग घेतला. ते, स्वतःला शांती पेरणारा शेतकरी असे म्हणायचे.
भारतात आणि परदेशातही त्यांनी अहिंसेबरोबरच सामाजिक न्यायासाठी विपुल काम केले. त्यांनी १९८७ मध्ये एम. के. गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉनव्हायोलन्सची स्थापना केली. त्यांनी ‘द गिफ्ट ऑफ द ॲंगर : अँड अदर लेसन्स फॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’, ‘लिगसी ऑफ लव्ह’, ‘बी द चेंज- अ ग्रॅंडफादर गांधी स्टोरी’, ‘डॉटर ऑफ मिडनाईट’ आदी विविध पुस्तकांचे लेखन केले. पत्रकार म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. ते, अमेरिकत स्थायिक असतानाही प्रत्येक वर्षी भारतात येत. आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
दरम्यान, गांधी ‘अवनि’चे अध्यक्ष अरुण चव्हाण यांचे मित्र. त्यांनी २००८ मध्ये गांधी वर्ल्डवाईड एज्युकेशन इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि त्या माध्यमातून ‘अवनि’ संस्थेच्या उपेक्षित आणि शोषित मुलांच्या पुनर्वसनाच्या कामाला बळ दिले. त्यांनी फेब्रुवारीत संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावली आणि ते येथेच थांबले. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या हणबरवाडी येथील घरी ते वास्तव्यास होते. येथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा ८९ वा वाढदिवसही नुकताच संस्थेच्या वतीने साजरा झाला होता.

असाही ऋणानुबंध...
अरुण गांधी यांचे दोन दशकाहून अधिक काळ कोल्हापूरशी जिव्ह्याळ्याचे संबंध राहिले. ‘अवनि’ संस्थेच्या कामाबरोबरच त्यांच्या ‘लिगसी ऑफ लव्ह’ आणि ‘गिफ्ट ऑफ ॲंगर’ या इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद कोल्हापूरच्या प्रसिद्ध लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केला आहे. साधना प्रकाशनातर्फे ‘वारसा प्रेमाचा’ व ‘वरदान रागाचे’ ही पुस्तके मराठीत प्रसिद्ध झाली असून ती आजही वाचकप्रिय आहेत.