
ओवळीये माजी उपसरपंचाच्या खून प्रकरणी सख्खा भावास अटक
00136 - लवु सावंत
00137 -
सावंतवाडी ः संशयित अजित सावंत याला येथील न्यायालयात नेताना पोलिस.
ओवळीये येथील माजी उपसरपंचाच्या
खून प्रकरणी सख्ख्या भावास अटक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः ओवळीये येथील माजी उपसरपंचाचा खून त्यांच्याच सख्ख्या भावाने केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. परिस्थितीजन्य पुरावे, तसेच श्वानपथकाने दाखविलेला माग यावरून याप्रकरणी आज ग्रामपंचायत सदस्य अजित रामा सावंत (वय ५६) याला येथील पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. संशयिताने मात्र खून आपण केला नसल्याचा दावा केला आहे.
ओवळीयेचे माजी उपसरपंच लवू रामा सावंत (वय ५८) यांचा खून झाल्याचे सोमवारी (ता.१) उघड झाले होते. संशयिताच्या टोपीवर तसेच चपलांवर मृताच्या रक्ताचे डाग सापडले. मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून तसेच अन्य पुराव्याच्या शोधात आम्ही आहोत. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश आहे का, यादृष्टीने तपास करीत आहोत, असे येथील पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः ओवळीये-वरचीवाडी येथील रहिवासी व ओवळीयेचे माजी उपसरपंच लवू सावंत घरापासून जवळच असलेल्या मालकीच्या शेतमांगरात झोपण्यासाठी रविवारी (ता. ३०) गेले होते. तेथे त्यांचा मध्यरात्री अज्ञाताकडून चिऱ्याच्या दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. सोमवारी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे बंधू अजित सावंत नेहमीप्रमाणे शेतमांगराकडे गेले असता त्यांना भाऊ लवू यांचा मृतदेह आढळून आला. चेहरा चिऱ्याच्या दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला होता. तो दगड मृतदेहाच्या शेजारीच आढळून आला होता. याची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस निरीक्षक मेंगडे व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेहाच्या ठिकाणावरून पोलिसांनी दोघांचे कपडे ताब्यात घेतले. त्यात सख्खा भाऊ अजित सावंत यांचा शर्ट व टोपी होती. त्याच्या टोपीवर तसेच चप्पलवर पोलिसांना रक्ताचे डाग आढळून आले. याबद्दल पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता आपण मृतदेह उचलून बाजूला केल्यामुळे हे डाग लागले, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांचा संशय बळावला. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान फिरून फिरून पुन्हा संशयिताकडेच जाऊन घुटमळले. त्यानंतर श्वानाने चक्क अजित सावंत यांच्यावरच झडप घातली. त्यामुळे पोलिसांचा संशय पक्का ठरला. या खूनप्रकरणी संशयित अजित सावंत व अन्य एका नातेवाईकाला पोलिसांनी तातडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले व सोमवारी दिवसभर त्यांची कसून चौकशी केली. तरीही संशयित अजित सावंत याने आपण खून केला नसल्याचे पोलिसांना सांगितले.
घटनास्थळी मिळालेले पुरावाजन्य शर्ट, टोपी व परिस्थितीनुसार हा खून सख्खा भाऊ अजित सावंत यानेच केल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्यावरून आज या खूनप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी भाऊ अजित सावंतवर गुन्हा दाखल केला आहे. त्याला सायंकाळी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
रागाच्या भरात?
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी घटनास्थळी दाखल होत आढावा घेतला. खुनामुळे ओवळीये हादरून गेले आहे. संशयित अजितला दारूचे व्यसन होते. त्यामुळे मृत व त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. त्यामुळे रागाच्या भरात खून झाल्याची शक्यता पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी वर्तवली आहे.