शैक्षणिक विकासासाठी भरघोस निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक विकासासाठी भरघोस निधी
शैक्षणिक विकासासाठी भरघोस निधी

शैक्षणिक विकासासाठी भरघोस निधी

sakal_logo
By

00129
बांदा ः ई-लर्निंगचे उद्‍घाटन करताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

शैक्षणिक विकासासाठी भरघोस निधी

दीपक केसरकर; बांद्यात ‘माझी ई-शाळा’ कार्यक्रमाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ ः भारताने जगाचे नेतृत्व केले पाहिजे. त्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. मुलांना हसत खेळत शिक्षण घेता यावे, यासाठी शाळेतील ‘पहिले पाऊल’, हा उपक्रम प्रभावी ठरेल. महाराष्ट्राच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त हक्क लहान मुलांचा आहे. त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध असणार आहे. यावर्षीपासून प्रत्येक मुलाला गणवेश व शैक्षणिक साहित्य मोफत मिळणार आहे. बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेची रोल मॉडेलसाठी निवड केली असून आधुनिक शिक्षण पद्धती अंमलात आणण्यासाठी वर्षभरात १ कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राजकारणापेक्षा जनतेच्या हिताकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत राज्याच्यावतीने शाळा पूर्वतयारी पहिले पाऊल व माझी ई-शाळा उद्‍घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मंत्री केसरकर बोलत होते. व्यासपीठावर राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, राज्य प्रकल्प संचालक केदार पगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, बांदा उपसरपंच जावेद खतीब, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, तुकाराम लालगे, तहसीलदार अरुण उंडे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर आदी उपस्थित होते.
शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, ‘‘गतवर्षीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमात ९ लाखांपेक्षा माता व १२ लाखांपेक्षा मुलांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये ३० टक्के विकास दिसून आला. त्यामुळे यंदापासून हा उपक्रम अधिक प्रभावी झाला पाहिजे, त्यासाठी हा उपक्रम आहे. यात ज्युनिअर, सीनिअर केजीतील मुलांना कसे शिकवावे, हे ट्रेनिंग दिले जाणार आहे. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी पाया भक्कम असला पाहिजे. ‘पीएमसी’ अंतर्गत बांदा प्राथमिक शाळेसाठी १ कोटी ८५ लाख रुपये निधी देणार असून लवकरच येथील शहरातील मुले बसने शाळेत येतील. त्यासाठी एक बस लवकरच शाळेला देण्यात येईल. राज्यात ही शाळा मॉडेल म्हणून उभी राहण्यासाठी माझे विशेष लक्ष आहे. प्राथमिक शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा, यासाठी आंबोली-गेळे येथे ५०० मुलांच्या वसतिगृहाची शाळा उभारण्यात येणार आहे.’’
प्रधान सचिव देओल म्हणाले, ‘‘तिसरी इयत्तेत जाताच मुलांना पूर्णपणे लिहिता वाचता आले पाहिजे. त्यासाठी आमचे विशेष प्रयत्न आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी शिक्षण क्षेत्रात अग्रणी असून येथील विद्यार्थी हुशार आहेत. येत्या कला ई- लर्निंगबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्हर्च्युअल क्लासरूमचा फायदा मुलांना कसा घेता येईल, याकडे लक्ष असणार आहे.’’
बैलगाडीतून शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्हर्च्युअल क्लासरूम, ई-लर्निंग, संगणक लॅबचे उद्‍घाटन करण्यात आले. बाळा आंबेरकर, मृण्मयी पंडित, महेश कदम, राजेश ठाकूर, आर्या देऊलकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, सरोज नाईक, जे. डी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेतू पुस्तकाचे, घडी पत्रिकेचे व बांदा शाळेच्या ‘सोनेरी क्षण’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ई-लर्निंगच्या उद्‍घाटन प्रसंगी मंत्री केसरकरांनी मुलांसोबत गप्पा मारल्या. त्यांना शाळेत येताना जाताना काही अडचणी आहेत का, याची विचारपूस केली. काहींना प्रश्नही विचारले. व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून राज्यातील अकोला व पालघर येथील मुलांशी त्यांनी संवाद साधला.
..............
चौकट
बांदा केंद्रशाळेत आठवीचा वर्ग
बांदा केंद्रशाळेला आठवीचा वर्ग मंजूर केला असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री केसरकर यांनी दिल्या. आठवीचा वर्ग मिळाल्यास बांदा केंद्रशाळा ही जिल्ह्यातील पहिलीच शाळा ठरणार आहे. शाळा परिसरात मुलांच्या भौतिक, बौद्धिक विकासासाठी सात स्टॉल उभारण्यात आले. मंत्री केसरकरांनी याची माहिती घेत शुभेच्छा दिल्या.